बिहार,
Nitish Kumar बिहारमध्ये या वर्षी विधानसभेचे निवडणूक होणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री नितीश कुमार सातत्याने मोठे निर्णय घेत आहेत. रविवारी (१३ जुलै) त्यांनी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली — राज्य सरकार येत्या पाच वर्षांमध्ये (२०२५ ते २०३०) एक कोटी तरुणांना नोकरी आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे.
मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी समाजमाध्यम ‘एक्स’ (पूर्वीचे ट्विटर) वरून ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, राज्यातील तरुणांना स्वरोजगाराच्या संधी देण्यासाठी आणि त्यांचा कौशल्यविकास करण्याच्या उद्देशाने “जननायक कर्पूरी ठाकुर कौशल्य विद्यापीठ” स्थापन करण्यात येणार आहे. हे विद्यापीठ राज्यात व्यावसायिक आणि तांत्रिक प्रशिक्षणासाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
नितीश कुमार यांच्या म्हणण्यानुसार, २०२० ते २०२५ या कालावधीत मिळालेल्या संधींची संख्या दुप्पट करून एक कोटी युवकांना रोजगार व नोकरीशी जोडण्याचे लक्ष्य आहे. यासाठी राज्यातील औद्योगिक क्षेत्रांसह खासगी क्षेत्रांत नव्या संधी निर्माण केल्या जाणार आहेत. यासंदर्भात एक उच्चस्तरीय समिती गठीत होणार असून ती ठोस योजना तयार करेल.
मुख्यमंत्र्यांनी Nitish Kumar सांगितले की, आतापर्यंत १० लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या आणि सुमारे ३९ लाख लोकांना रोजगार मिळवून देण्यात सरकारला यश आले आहे. “सात निश्चय” योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात याचा विस्तार करण्यात येईल, ज्यामध्ये कौशल्य प्रशिक्षणाद्वारे तरुणांना आत्मनिर्भर करण्यात येईल.२००५ ते २०२० या काळात सुमारे आठ लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या होत्या. त्यानंतर २०२० मध्ये ‘सात निश्चय-२’ अंतर्गत १० लाख सरकारी नोकऱ्या आणि १० लाख रोजगाराच्या संधी देण्याचे उद्दिष्ट जाहीर करण्यात आले होते. हे लक्ष्य वाढवून २०२५ पर्यंत १२ लाख सरकारी नोकऱ्या आणि ३८ लाख रोजगार संधींचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे.
राज्य सरकारच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे येत्या काळात बिहारमधील तरुणांच्या हातात नव्या संधींचा उजळलेला प्रकाश येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.