तहसीलदाराने दिला ‘आदेश’ उपविभागीय अधिकार्‍याने रोखला

13 Jul 2025 21:26:05
सिंदी रेल्वे, 
 Farmers News-Khapri : सेलू तालुक्यातील खापरी येथील ८ शेतकर्‍यांची ३२ एकर शेती नाल्यालगत आहे. मात्र, वहिवाटीसाठी रस्ता नसल्याने तहसीलदाराने चौकशी करून त्या शेतकर्‍यांना वहिवाटीसाठी रस्ता बनवून दिला. मात्र, एक फोन येताच वर्धेच्या उपविभागीय अधिकार्‍यांनी हा रस्ता रोखला. त्यामुळे आठही शेतकर्‍यांची वहिवाट बंद झाली असून आता शेती कशी करायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाला आहे.
 
 
JKL
 
खापरी शिवारात जीवन देवळीकर, संजय देवळीकर, रवी देवळीकर, मारुती गव्हाळे, देवेंद्र देवतळे, बंडू देवळीकर, देवतळे व सुरेश पिंपळे अशा आठ शेतकर्‍यांची ३२ एकर शेती आहे. या शेतीच्या बाजूनेच एक नाला गेलेला होता. या नाल्याच्या बाजूने शेतकर्‍यांच्या वहिवाटीसाठी रस्ता होता. गावात या नाल्याचे पाणी शिरू नये म्हणून या नाल्याचे रुंदीकरण करण्यात आले. नाला रुंदीकरणामुळे या शेतकर्‍यांची वहिवाट बंद झाली होती. शेतकर्‍यांनी सेलूचे तहसिलदार मलिक विराणी यांना निवेदन दिले.
 
 
तहसिलदारांनी नायब तहसिलदार ठाकरे यांना घटनास्थळी पाठवून चौकशी करून शेतकर्‍यांना नाल्याच्या काठावरून रस्ता दिला होता. या अगोदर येथील एका महिला शेतकर्‍याचे शेत आहे. महिला शेतकर्‍याने आपल्या नातेवाईकांसह हा रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, तहसिलदार व ठाणेदारांनी मोकाचौकशी करून हा रस्ता संबंधित शेतकर्‍यांची निकड लक्षात घेऊन वहिवाटीसाठी खुला केला होता. परंतु, येथील उपविभागीय अधिकार्‍यांना फोन करून सेलूच्या तहसीलदाराने दिलेला रस्ता स्थगित करण्याची मागणी केली. उपविभागीय अधिकार्‍यांनी तहसिलदार किंवा शेतकर्‍यांचे कोणतेही म्हणणे ऐकून न घेता तहसिलदारांनी दिलेला शेतकर्‍यांच्या वहिवाटीचा रस्ता देण्याच्या तहसीलदाराच्या आदेशावर ‘स्टे’ आणून रस्ता बंद केला. त्यामुळे या शेतकर्‍यांवर शेती कशी करावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0