आर्वी,
Asolenagar : शहरातील मायबाई प्रवेश द्वारापासून चोरडिया मिल समोरून आसोलेनगराकडे जाणारा मार्ग खड्डेमय झाला असून त्या खड्ड्यात आता पावसाचे पाणी साचत असल्याने चिखल झाला आहे. हा चिखल शाळकरी मुलांच्या अंगावर उडतो. तसेच नागरिकांनाही आवागमन करणे कठीण झाल्याने या चिखलातून मार्ग कसा काढावा, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. या रस्त्याकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून नागरिकांमध्ये रोष व्यत केला जात आहे.
आसोलेनगरकडे जाणारा रस्ता शहराशी जोडणारा प्रमुख मार्ग आहे. पण, नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे सध्या हा मार्ग चिखलमय झाला आहे. शाळकरी मुलांसह नागरिकांना या रस्त्यावरून मार्ग काढताना तारेवरची कसरत करावी लागते. शहरात अनेक रस्त्यांची विकास कामे होत असताना आसोलेनगराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहे. दोन आमदार आणि खासदार याच शहरातील असतानाही या महत्त्वाच्या रस्त्याकडे केव्हा लक्ष देणार? आणखी किती दिवस असा चिखमल व खडतर प्रवास करावा लागणार, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
मागील आठवड्यात सतत तीन दिवस जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरातील अनेक नवीन कॉलनीमध्ये पाण्याच्या निचर्याकरिता नाल्यांची व्यवस्था नसल्यामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचून आहे. अनेक नवीन कॉलनीमध्ये अंतर्गत रस्ते काही प्रमाणात झाले. मात्र, शहराला जोडणारे मुख्य रस्ते अजूनही न झाल्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.