वर्धा,
Blade Attack for Seat : अहमदाबाद-हावडा या १२८३३ धावत्या रेल्वे गाडीत आसनासाठी दोघांमध्ये फ्रि-स्टाईल झाली. ही घटना आज १३ रोजी एस-१ या कोचमध्ये घडली. या प्रकरणातील दोन्ही जखमींना वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी वर्धा लोहमार्ग पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

छत्तीसगढ येथील नरेशकुमार वर्मा हे १२८३३ क्रमांकाच्या अहमदाबाद-हावडा एस्प्रेसच्या एस-१ कोच मधून नियोजित ठिकाणी जात होते. ते आपल्या आरक्षीत आसनावर बसून असताना धामनगाव रेल्वे स्टेशननंतर धामनगाव येथील आशिष मिसाळ हा रेल्वेत चढला. तो नरेशकुमार यांच्या आसनावर बसला असता त्यास येथे बसू नका हे माझे आसन आहे असे सांगण्यात आले. नंतर आसनाच्या कारणावरूनच आशिष व नरेश यांच्याच चांगलीच शाब्दिक खडाजंगी झाली. सुरुवातीला शाब्दिक वाद सुरू असतानाच थेट ब्लेडने मारहाण करण्यात आली. या मारहाणीत नरेशकुमार व आशिष हे दोघे जखमी झाले. धावत्या रेल्वेत ब्लेड हल्ला झाल्याची माहिती मिळताच वर्धा येथील रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी व कर्मचारी अॅशन मोडवर आले. पुलगाव रेल्वे स्थानक येथून एएसआय गजभीये यांनी रेल्वे चढून आशिषला ताब्यात घेतले. त्यानंतर आशिष व नरेशकुमार यांना वर्धा रेल्वे स्थानकावर उतरविण्यात आले. जखमी आशिष व नरेशकुमार यांना रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक छेदीलाल कनोजिया यांच्या मार्गदर्शनात प्रिती सहारे व इतर जवानांनी रुग्णालयाकडे रवाना केले. वृत्तलिहिस्तोवर या प्रकरणी तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया वर्धा लोहमार्ग पोलिसांकडून केली जात होती.