तभा वृत्तसेवा
राळेगाव,
Yavatmal accident : हायड्रा क्रेन व ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन अपघात झाला, यामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, ही घटना रविवार, 13 जुलै रोजी सकाळी 11 वाजता राष्ट्रीय महामार्ग 44 वरील कारेगाव फाट्यासमोर घडली. प्राप्त माहितीनुसार, राष्ट्रीय महामार्गावरील कारेगाव फाट्यासमोर असलेल्या वर्धा नदीच्या पुलाचे काम चालू असल्यामुळे कंपनीद्वारे महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू करण्यात आली होती.
त्यामुळे तेलंगण राज्यातून केए07 ए7407 हा ट्रक टमाटे घेऊन नागपूरकडे जात होता. यावेळी समोरून येणाèया क्रेनने कारेगाव फाट्यासमोर या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नसून ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून क्रेन चालकाने पळ काढल्याने नागरिकांचा मोठा जमाव जमला होता. अपघातातील दोन्ही वाहने महामार्गाच्या मधोमध असल्याने नागपूर व हैदराबादकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. दोन्ही बाजूंनी वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
ही माहिती मिळताच वडकी पोलिस ठाणेदार सुखदेव भोरकडे, उपनिरीक्षक सुनील कुडमते, संदीप मडावी, आकाश कुदुसे, अमोल चौधरी, निलेश वाढई, अमीर किनाके यांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही वाहने बाजूला करून ठप्प वाहतूक सुरळीत केली. दोन्ही अपघातग्रस्त वाहने जप्त करून वडकी पोलिस ठाण्यात लावण्यात आली आहे.
महामार्ग कंपनीच्या हलगर्जीपणामुळे वाढले अपघात
अपघातातील हायड्रा क्रेन ही महामार्गाच्या कामावर असल्याची माहिती आहे. क्रेन चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात घडून आला व यामध्ये ट्रकचे मोठे नुकसान झाले. हा अपघात झाला त्यावेळी ही दोन्ही वाहने रस्त्याच्या मधोमध होती. मात्र महामार्ग अधिकारी घटनास्थळी आलेसुद्धा नाहीत. त्यामुळे महामार्गावर दोन तास वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूनी वाहनाच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
यावेळी समस्त वाहनचालकांनी महामार्ग अधिकारी व कर्मचाèयांबाबत रोष व्यक्त केला. महामार्ग सुरक्षेची जबाबदारी टोलचालकाला दिली आहे. यासाठी महामार्ग कंपनी व पेट्रोलिंग अधिकारीसुद्धा कार्यरत आहेत. मात्र या कंपनीकडून वाहनचालकांना कुठल्याच सुविधा पुरविल्या जात नाहीत. फक्त वाहनांकडून टोल वसुली करण्यातच ही कंपनी धन्यता मानत असते.
अपघातस्थळी महामार्ग अधिकारी असूनसुद्धा त्यांच्याकडून कुठलीच मदत न मिळाल्यामुळे इतर वाहन चालकांना मनस्तापक्ष झाला. अखेर घटनास्थळी पोलिसांनी येऊन महामार्गाची वाहतूक सुरळीत केली. त्यामुळे अशा मुजोर महामार्ग अधिकारी व कर्मचाèयांवर कारवाई करून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी महामार्गावरील वाहन चालकांनी केली आहे.