निमिषा प्रियाची फाशी थांबविण्यासाठी मुस्लिम धर्मगुरूंचा पुढाकार!

    दिनांक :15-Jul-2025
Total Views |
येमेन,
Nimisha Priya's hanging भारतीय नर्स निमिषा प्रिया हिला येमेनमध्ये १६ जुलै रोजी होणाऱ्या फाशीपासून वाचवण्याच्या प्रयत्नांना नवी दिशा मिळाल्याचे संकेत मिळत आहेत. भारतातील प्रतिष्ठित मुस्लिम धर्मगुरू आणि ग्रँड मुफ्ती कंठापुरम ए.पी. अबूबकर मुसलियार यांच्या हस्तक्षेपानंतर निमिषा प्रिया हिच्या जीवनावर आलेले संकट काहीसे हलके झाले आहे. ग्रँड मुफ्तींच्या विनंतीनुसार, येमेनमधील प्रसिद्ध सूफी धर्मगुरू शेख हबीब उमर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर येमेनमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बंद दाराआड झालेल्या बैठकीत येमेनी सरकारचे प्रतिनिधी, फौजदारी न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश, मयत तलाल यांचे कुटुंबीय, आदिवासी नेते एकत्र आले होते. या बैठकीत मृताच्या कुटुंबीयांना दयादान (रक्तपैसा) स्वीकारण्याविषयी पटवून देण्याचा प्रयत्न झाला.
 
Nimisha Priya
 
 
दरम्यान भारत सरकारने सर्वोच्च न्यायालयात स्पष्टपणे सांगितले की येथे भारतीय दूतावास नसल्यामुळे येमेनमध्ये हस्तक्षेप करण्याच्या सरकारच्या मर्यादा आहेत. परंतु केंद्र सरकारने हेही स्पष्ट केले की त्यांनी अभियोक्त्याशी पत्राद्वारे संपर्क साधला असून शेख हबीब उमर यांच्या माध्यमातून वाटाघाटी सुरू केल्या आहेत. सरकारचे म्हणणे आहे की जोपर्यंत मृताच्या कुटुंबीयांकडून क्षमा किंवा दयादान मान्य होत नाही, तोपर्यंत फाशी रोखणे कठीण आहे. सर्वोच्च न्यायालयाने सरकारला पुढील स्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान पलक्कड (केरळ) येथील रहिवासी निमिषा प्रिया २००८ मध्ये नोकरीसाठी येमेनला गेली होती. २०१७ मध्ये आपल्या येमेनी व्यावसायिक भागीदाराची हत्या केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला. २०२० मध्ये तिला दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. Nimisha Priya's hanging २०२४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने तिचे अपील फेटाळले आणि १६ जुलै २०२५ रोजी फाशीची तारीख निश्चित झाली आहे. ग्रँड मुफ्तींचा हस्तक्षेप आणि सूफी नेत्यांची मध्यस्थी हे निमिषासाठी शेवटचे आशेचे किरण मानले जात आहेत. येमेनी समाजात धार्मिक नेत्यांचे प्रभावी स्थान असल्यामुळे, मृताच्या कुटुंबाला क्षमा देण्यास पटवून देणे शक्य ठरू शकते.