पुणे,
Dr. Deepak Tilak passes away लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे पणतू, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, विचारवंत आणि ‘केसरी’ वृत्तपत्राचे विश्वस्त संपादक डॉ. दीपक टिळक यांचे आज, १६ जुलै रोजी पहाटे पुण्यातील राहत्या घरी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते आणि अल्पशा आजाराने ग्रस्त होते. त्यांच्या निधनामुळे पुणे शहराच्या शैक्षणिक, पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात शोककळा पसरली आहे. डॉ. दीपक टिळक यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षण, मूल्याधिष्ठित पत्रकारिता आणि राष्ट्रसेवेसाठी अर्पण केले. ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू होते. ‘केसरी’ या ऐतिहासिक वृत्तपत्राच्या संपादकपदाची जबाबदारी त्यांनी निष्ठेने पार पाडली. तसेच लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
विचारवंत आणि सुसंस्कारित नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे डॉ. टिळक यांना २०२१ मध्ये जपानी भाषेच्या प्रसारासाठी विशेष सन्मान मिळाला होता. जपान सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांना गौरव प्रदान केला होता. त्याशिवाय, विविध शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये ते सक्रिय राहिले. त्यांच्या निधनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दुःख व्यक्त केले. शिक्षण, पत्रकारिता आणि समाजसेवा या क्षेत्रातील त्यांचे योगदान अमूल्य आहे. Dr. Deepak Tilak passes away त्यांनी 'केसरी'च्या माध्यमातून राष्ट्रभक्ती, लोकशिक्षण आणि मूल्याधिष्ठित विचारांचा प्रचार केला, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात नमूद केले. त्यांच्या जाण्याने पुणेच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. टिळक हे केवळ एका कुटुंबाचे नव्हे, तर विचारांची आणि संस्कृतीची शाश्वत ज्योत होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, शैक्षणिक आणि पत्रकारितेच्या इतिहासात एक शोकांत अध्याय लिहिला गेला आहे.