बीजिंग,
Student in China has affair with foreign man चीनमधील एका विद्यापीठातून समोर आलेल्या धक्कादायक प्रकरणाने संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा निर्माण केली आहे. डॅलियान पॉलिटेक्निक विद्यापीठाने आपल्या २१ वर्षीय विद्यार्थिनीला एका युक्रेनियन नागरिकासोबत वैयक्तिक संबंध ठेवले म्हणून विद्यापीठातून निलंबित केले आहे. या निर्णयानंतर चीनमधील सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली असून अनेकांनी याला वैयक्तिक स्वातंत्र्यात घालणारी ढवळाढवळ आणि लिंगभेदाचे उदाहरण म्हटले आहे. ही विद्यार्थिनी ३७ वर्षीय डॅनिलो टेस्लेन्को नावाच्या युक्रेनियन नागरिकाच्या संपर्कात गेल्या वर्षी आली होती. टेस्लेन्को हा "काउंटर स्ट्राइक" हा लोकप्रिय व्हिडिओ गेम खेळणारा व्यावसायिक गेमर होता.

डिसेंबर २०२४ मध्ये एका कार्यक्रमादरम्यान ही ओळख झाली आणि त्यानंतर त्यांचे नाते वैयक्तिक पातळीवर गेले. मात्र, काही दिवसांपूर्वी टेस्लेन्कोने विद्यार्थिनीसोबतचे खाजगी क्षणांचे फोटो आपल्या सोशल मीडिया ग्रुपमध्ये शेअर केले, जे पुढे व्हायरल झाले. या प्रकरणावर विद्यापीठ प्रशासनाने तीव्र भूमिका घेत विद्यार्थिनीवर कारवाई केली. विद्यापीठाच्या मते, तिच्या वर्तनामुळे "राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्का बसला" आणि "चिनी सांस्कृतिक व सामाजिक मूल्यांचा भंग" झाला. विद्यापीठाने १६ डिसेंबर २०२४ रोजी निर्णय घेतला आणि ८ जुलै २०२५ रोजी अधिकृतरित्या तिला विद्यापीठातून निलंबित केल्याचे जाहीर केले. विद्यापीठाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्याला निलंबित करण्यासाठी ८ विशिष्ट कारणे आहेत. तज्ञांच्या म्हणण्यानुसार, या विद्यार्थिनीच्या प्रकरणात ही कारणं थेट लागू होत नाहीत. त्यामुळे विद्यापीठाने घेतलेला निर्णय मनमानी आणि पक्षपाती असल्याचा आरोप होत आहे.
चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. अनेक युजर्सनी विद्यापीठाच्या या निर्णयाला स्त्रियांच्या स्वातंत्र्यावरील आघात, लैंगिक दुजाभाव आणि व्यक्तिस्वातंत्र्याचा अपमान असे संबोधले आहे. काहींनी विचारले आहे की, जर संबंध परस्पर संमतीने झाले असतील आणि फोटो व्हायरल होण्यामागे विद्यार्थिनीचा दोष नसेल, तर शिक्षेसाठी ती एकटीच का जबाबदार? या प्रकरणात विद्यार्थिनीला ७ सप्टेंबर २०२५ पर्यंत विद्यापीठाच्या निर्णयाविरोधात अपील करण्याचा अधिकार आहे. सध्या ती कायदेशीर सल्ला घेत असल्याचे बोलले जात आहे.