खेळीमेळीतील पेचप्रसंग!

    दिनांक :18-Jul-2025
Total Views |
 
 
अग्रलेख
politics-bjp भारतीय जनता पार्टी हा केवळ सत्ताकारण करणारा नव्हे, तर माणसे जोडणारा पक्ष आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तसे नसते, तर गेल्या सहा वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणात जे काही घडले त्यामुळे या पक्षास जबर फटका सोसावा लागला, ते सारे विसरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे यांना विधिमंडळात दिलेल्या ऑफरची चर्चा सुरू झाली नसती. सहा वर्षांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी जनादेश नाकारून, युती धर्मास तिलांजली देऊन भाजपाला सोडचिठ्ठी दिली आणि काँग्रेस-राष्ट्रवादीशी संगनमत करून महाविकास आघाडी या नावाने अनैतिक सरकार स्थापन केले. भाजपावर विरोधात बसण्याची वेळ आली. देवेंद्र फडणवीस हे विरोधी पक्षनेते म्हणून विधिमंडळात दाखल झाले. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे भाजपाच्या राजकारणाचे वर्णन केले जाते. अनेकदा विरोधक त्याची खिल्ली उडवितात. पण भाजपा हा सूडाच्या आणि कुरघोडीच्या अलिकडच्या राजकारणाहून वेगळाच पक्ष आहे. या पक्षात मतभेदास जागा नाही, हे फडणवीस यांनी बुधवारी विधिमंडळात दाखवून दिले. सहा वर्षांपूर्वी युतीला सोडचिठ्ठी देऊन महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्रिपदाच्या मोहास बळी पडणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी विश्वासघात केला, त्याचा विसर आपल्याला कधीही पडणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी त्यानंतर कितीतरी वेळा सांगितले असले, तरी उद्धव ठाकरे यांचे टोमणे, आरोप, आव्हाने आदी सारे काही विसरून फडणवीस यांनी बुधवारी सभागृहात दाखविलेला दिलदारपणा पक्षाचे वेगळेपण अधोरेखित करणारा ठरतो. भाजपाचा कार्यकर्ता माणसे जोडतो, हे त्यांनी त्या वक्तव्यातून दाखवून दिले. आता भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीकडे भक्कम बहुमत असल्याने व जनादेशाचा कौलही महायुतीच्याच पाठीशी असल्याचे वारंवार स्पष्ट होत असल्याने, भाजपा वा महायुतीस विरोधात बसण्याची वेळ येण्याची शक्यता नाहीच; मात्र विरोधात बसलेल्या कोणासही भाजपासोबत येण्याची व पर्यायाने सत्तेत सहभागी होण्याची संधी आहे, हे फडणवीस यांचे वक्तव्य राजकीयदृष्ट्या मिश्कीलपणाचा अस्सल वैदर्भीय ठसका असला, तरी ठाकरे यांच्यासाठी ते नेमके वर्मावर ठेवले गेलेले बोटच होते, यात शंका नाही.
 
 
 
 
देवेंद्र फडणवीस
 
 
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सदस्यत्वाची मुदत 29 ऑगस्ट रोजी संपत आहे. त्याआधीच्या अधिवेशनाच्या अखेरच्या सत्रात दानवे यांना निरोप देण्याचा कार्यक्रम सभागृहात संपन्न झाला. त्या निमित्ताने दानवे यांच्या कार्यशैलीची स्तुती करताना फडणवीस यांनी जुन्या घडामोडींच्या आठवणी पुसून टाकत खेळीमेळीच्या वातावरणात त्यांना शुभेच्छा दिल्या आणि विरोधात असलेल्यांना सत्तेसोबत येण्याची संधी असते, या वास्तवाची खुमासदार आठवण करून देत ठाकरे यांना महायुतीसोबत येण्याचे आमंत्रण दिले. माध्यमांत आणि राजकीय वर्तुळात त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आणि ठाकरे यांना त्यावर प्रतिक्रिया देणे भागच पडले, तेव्हा अशा गोष्टी खेळीमेळीने घ्यायच्या असतात, अशी सारवासारव करणारे प्रत्युत्तर ठाकरे यांनी दिले. मात्र, फडणवीस यांच्यावरील पक्षाच्या वेगळेपणाचे संस्कार आणि ठाकरे यांच्या राजकारणाचा इतिहास पाहता, फडणवीस यांनी दिलेले आमंत्रण ही त्यांच्या वैरभावरहित राजकारणाची अभिनंदनीय बाजू आहे, असेच म्हणावे लागेल. दुसऱ्या बाजूने ठाकरे यांच्या वाटचालीचा इतिहास पाहता ते तडजोड करणारच नाहीत, असे कोणीच छातीठोकपणे सांगू शकणार नाही, हेही वास्तव आहे.
 
ठाकरे यांच्या शिवसेनेत गेल्या चार-पाच दशकांत अनेकदा फूट पडली. बाळासाहेबांवर निष्ठा असलेले अनेक कट्टर कार्यकर्ते पक्षाबाहेर पडले. राज ठाकरे, छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, एकनाथ शिंदे यांच्यासारखे बिनीचे मोहरे पक्षाबाहेर पडले, पण प्रत्येक फुटीमागे केवळ सत्तालोभाचे कारण नव्हते. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वशैलीवरील नाराजी आणि नेतृत्वावरील अविश्वास हेच प्रत्येक फुटीमागचे कारण होते, हा इतिहास आहे. तरीही एकनाथ शिंदे यांच्या बंडाने पक्षाची पुरती वाताहत झाल्याने, त्याचे खापर फोडण्यासाठी निमित्त शोधणे सुरू होते. त्यातूनच त्यांचा ‘खोके सिद्धान्त’ जन्माला आला. उलट नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याने तर मातोश्रीवरच खोक्यांचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती. आम्ही खोके आणि पाकिटे दिली नसती तर मातोश्री उभी राहिली नसती, असा थेट आरोप त्यांनी एका जाहीर सभेत केला होता. त्यामुळे पक्षातील नेत्यांना भाजपाने पळविले हा केवळ कांगावा होता. उद्धव ठाकरे यांच्या कार्यशैलीस कंटाळूनच हे नेते बाहेर पडले ही वस्तुस्थिती होती, हे लपून राहिलेले नाही. या संदर्भाचाच धागा पकडून बुधवारी विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गमतीने ठाकरे यांना चिमटा काढला. आता तुम्हालाही इकडे येण्याची संधी असून तुम्ही आलात तर वेगळा विचार करू, अशी थेट ऑफरच फडणवीस यांनी दिल्याने, भविष्यातील राजकारणाचा मागोवा घेण्याची चढाओढ राजकीय वर्तुळात आणि विश्लेषकांत सुरू झाली आहे. फडणवीस यांनी गमतीने दिलेला हा देकार ठाकरे मात्र गांभीर्याने घेणार का, यावरही चर्चा सुरू झाली आणि ठाकरे यांच्या सत्तेच्या तडजोडींचा इतिहासही उगाळला गेला. तसे नसते, तर सत्तेचा स्पष्ट जनादेश असतानाही, केवळ मुख्यमंत्रिपदाचा देकार मिळाला म्हणून युतीचे संकेत धाब्यावर बसवून उद्धव ठाकरे महाविकास आघाडीसोबत गेले असते का, असा प्रश्नही या चर्चेच्या निमित्ताने अधोरेखित झाला आहे.
 
केवळ उद्धव ठाकरेच नव्हे, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील भाजपेतर पक्षांमधील फुटीच्या इतिहासालाही सत्ताकारणाचीच किनार आहे. ज्या राजकीय पक्षांतून अन्य महत्त्वाचे नेते जेव्हा जेव्हा बाहेर पडले तेव्हा त्यांनी सत्तेच्या वळचणीचाच आसरा घेतल्याची अनेक उदाहरणे महाराष्ट्राने अनुभवलेली आहेत. सत्तेच्या राजकारणाची सवय झालेल्यांना सत्तेविना राहता येत नाही, हेच त्याचे कारण असल्याने, राष्ट्रीय राजकारणात राहिलेले काही प्रादेशिक नेतेही सत्तेच्या तडजोडी करताना महाराष्ट्राने पाहिले आहे. भाजपा हा अशा राजकारणातील अपवाद आहे असे म्हणावे लागेल. सत्ता गमावल्यानंतर अनेक नेते तळ्यात-मळ्यात करू लागतात, सत्तेच्या सोबतीने राहण्यासाठी वैचारिक तडजोडी करतात, असेही दिसते. भाजपाचे वैचारिक संस्कार असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र सत्तेसोबत किंवा सत्तेविना अशा कोणत्याही राजकीय परिस्थितीचा परिणाम होत नाही, हे या पक्षाचे वेगळेपण आहे. सत्ता नसतानाही भाजपाचे कार्यकर्ते पक्षाशी एकनिष्ठ राहतात, राष्ट्रहितासाठी सत्ता हे या पक्षाच्या कार्यकर्त्यावरील संस्कार असल्याने, माणसे जोडणे व माणसांचे धागे जोडत पक्ष मजबूत करणे ही या पक्षाची राजनीती आहे. म्हणूनच विपरीत परिस्थितीतही भाजपाचे कार्यकर्ते किंवा नेत्यांमध्ये अन्य नेत्यांप्रमाणे पक्षांतराच्या प्रवाहात वाहून गेलेले सहसा दिसत नाहीत. त्यामुळेच भाजपा हा ‘पार्टी विथ डिफरन्स’ या बिरूदास पात्र असलेला पक्ष ठरतो. सत्ता हे या पक्षाच्या निष्ठावंत कार्यकर्त्याचे अंतिम ध्येय नसते. म्हणूनच विरोधी पक्षात राहूनही देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या पदास न्याय देत राज्याच्या हितासाठी सरकारशी केलेला संघर्ष महाराष्ट्रास पाहावयास मिळाला. सत्तेविना राहूनही राष्ट्रकार्य करता येते, हा या पक्षाचा संस्कार त्यांनी अंमलातही आणला. सत्ता नसलेल्या, विरोधात असणाऱ्या अन्य पक्षांना सत्तेसोबत येण्याची संधी असते, हे त्यांचे उद्धव ठाकरे यांना उद्देशून केलेले विधान शंभर टक्के सत्यच आहे. पण भाजपामध्ये तसे राजकारण करणारा नेता अभावानेच आढळतो. उलट, सत्तेशी जवळीक साधण्यासाठी कोणत्याही वैचारिक तडजोडी करण्यास अनेक नेते मागेपुढे पाहात नाहीत, अशीही अनेक उदाहरणे असून खुद्द ठाकरे यांच्या राजकारणातही याचेच प्रतिबिंब दिसते.politics-bjp कदाचित हे ओळखूनच देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंनाच सत्तेसोबत येण्याचे आमंत्रण दिले असावे. फडणवीस यांच्या या वक्तव्याची अनेक उलटसुलट अंगांनी चर्चा होईल. ठाकरे यांनी केलेल्या विश्वासघाताच्या राजकारणाचा विसर पडला का, असा प्रश्नही अनेकांस पडू शकेल, पण भूतकाळावर पांघरूण घालून भविष्यकाळाला वळण देण्याची ही कथित खेळीमेळीची खेळी अनेकांना बुचकळ्यात पाडणारी ठरेल, हे मात्र खरे आहे. फडणवीस यांनी टोलविलेल्या या चेंडूवर खेळायचे की तो सोडून द्यायचा, हे ठरविण्यासाठी राजकीय अनुभव पणाला लावावा लागेल, हे मात्र खरे.