मुंबई,
Raj Thackeray got angry महाराष्ट्राच्या विधीमंडळात झालेल्या धक्कादायक राड्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विरोधकांवर सडकून टीका केली आहे. भविष्यात विधानभवनात आमदारांचे खून पडले, तरी आता आश्चर्य वाटायला नको, असे तीव्र शब्द वापरत त्यांनी विधिमंडळातील राजकारणाच्या अधःपतनावर चिंता व्यक्त केली आहे. गुरुवारी विधानभवनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार झटापट झाली. यामुळे वातावरण चांगलेच तापले आणि अनेकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया दिल्या. मात्र, राज ठाकरे यांनी याला केवळ राजकीय गोंधळ न मानता, राज्याच्या प्रतिष्ठेवर लागलेला डाग असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये म्हटले, काल विधानभवनात कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी झाली. हा व्हिडिओ पाहून मन सुन्न होतं. सत्ता हे साधन आहे, साध्य नाही हे विसरले जात आहे. गलिच्छ टीका करण्यासाठी भंपक लोकांना पक्षात घेतले जाते आणि नंतर राजकारणात साधनशुचिता सांगितली जाते. हे सगळं महाराष्ट्राच्या जनतेने समजून घ्यायला हवं. त्यांनी पुढे विधानभवनातील गतकाळाची आठवण करून दिली. आमच्या दिवंगत आमदाराने एकदा विधानभवनात एका आमदाराला धक्का दिला होता, तो मराठी अपमान सहन न झाल्याने. आज मात्र राडे वैयक्तिक हेतूने, खुर्ची आणि प्रतिष्ठेसाठी होत आहेत.
आपल्या पक्षावर नेहमीच होणाऱ्या कारवाईवरही त्यांनी भाष्य करत म्हटले, मराठी भाषेसाठी आमचा कार्यकर्ता आवाज उठवतो, तर लगेच कारवाई होते. पण कालच्या घटनेतील दोषींवर काय कारवाई झाली? सत्ताधाऱ्यांमध्ये जर थोडीशी तरी साधनशुचिता शिल्लक असेल, तर आपल्या लोकांवरच कारवाई करून दाखवा. राज ठाकरेंनी राज्याच्या आर्थिक स्थितीवरही गंभीर प्रश्न उपस्थित केला. विधानमंडळाच्या एका दिवसाचा खर्च दीड ते दोन कोटी रुपये आहे. आणि दुसरीकडे राज्यात विकासासाठी निधी नाही, कंत्राटदारांची बिले थकलेली आहेत, Raj Thackeray got angryजिल्ह्यांचा विकास थांबलेला आहे. अशा वेळी हे अधिवेशन माध्यमांना फोडाफोडीचे खाद्य देण्यासाठी वापरण्यात येत आहे काय?” असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला. राज ठाकरेंच्या या संतप्त प्रतिक्रियेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, विधानभवनातील घटनांकडे जनतेचे लक्ष अधिक गंभीरतेने वळले आहे.