निवृत्ती-विश्रांती की एकटेपणाची सुरुवात?

    दिनांक :18-Jul-2025
Total Views |
 
 
वेध...
नंदकिशोर काथवटे
retirement आता निवृत्त व्हायचंय हे वाक्य ऐकलं की मनात शांततेचा, विश्रांतीचा आणि सुटकेचा विचार येतो. पण खरंच निवृत्ती म्हणजे फक्त विश्रांती असते का? की एकटेपणाची सुरुवात? निवृत्ती म्हणजे नेमकं काय? निवृत्ती म्हणजे एखाद्या व्यक्तीने ठरावीक वयानंतर नोकरी किंवा व्यवसायातून हात काढून घेणं. सरकारी नोकऱ्यामध्ये ही वयोमर्यादा साधारणतः 58 ते 60 वर्षं असते. काही खास पदांवर ही वयाची मर्यादा 62 किंवा 65 वर्षं असते. खाजगी कंपन्यांमध्ये ही वयोमर्यादा कंपनीच्या धोरणावर अवलंबून असते. पण हल्ली बऱ्याच लोकांना पन्नाशी पार केल्यावरच निवृत्तीचं वय झालंय असं वाटू लागतं. शारीरिक थकवा, कामाचा ताण, मुलं कमावती झाल्यानं आपण बाजूला व्हावं असा विचार काहींचा असतो.
 
 

retirment 
 
 
काहींना वाटतं की आता स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला हवा. पण यामागे एक गोष्ट दुर्लक्षित होते-निवृत्तीनंतरचं नियोजन. भारतामध्ये निवृत्तीनंतरचं काय? सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन, ग्रॅच्युइटी, भविष्य निर्वाह निधी (पीएफ) अशा योजना मिळतात. त्यामुळे निवृत्तीनंतरही त्यांची काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा असते. पण खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्यांना अशा योजना फारशा नसतात. बहुतांश वेळा लोक फक्त मुलं आहेत ना! या विश्वासावर निवृत्त होतात. घर आहे, थोडी बचत आहे आणि मुलं सांभाळतील असा विश्वास असतो. पण काही वेळा हे अपेक्षेप्रमाणे घडत नाही. मुलं का सांभाळत नाहीत, याला दोषी कोण? बऱ्याच वडिलधाऱ्यांची तक्रार असते मुलं विचारत नाहीत, सांभाळ करत नाहीत, पोरगा येतही नाही... पण ही तक्रार करताना आपण हे विसरतो की, आजची मुलंही जबाबदाऱ्यांच्या ओझ्याखाली वाकलेली असतात. नोकरी, कर्ज, स्वतःची मुलं, आयुष्याचे संघर्ष दुसरीकडे, वडिलधारी मंडळींनी निवृत्त होतानाच मुलांवर पूर्णपणे आर्थिक आणि मानसिक आधार ठेवलेला असतो. वय वाढल्यावर आजारपण, औषधं, हॉस्पिटलचे खर्च वाढतात. त्यात जर स्वतःची तयारी नसेल, तर मुलांवर ताण वाढतो आणि नातं तुटायला लागते. म्हणून प्रश्न असा उरतो, दोष मुलांचा की वडिलधाऱ्यांचा? की दोघांचाही? भारतात वृद्धापकाळासाठी तरतूद ही एक विसरलेली गोष्ट ठरत आहे. भारतात अजूनही वृद्धापकाळाची तयारी हा विचार फारच मागासलेला आहे. 40-45 वयाच्या आसपासच आपल्याला पुढच्या 20-30 वर्षांचा विचार करायला हवा. आरोग्यविमा, निवृत्तीनंतरची बचत, पेन्शन योजना, गुंतवणूक हे सगळं गरजेचं आहे. मात्र बरेच जण हे म्हणतात, मुलं आहेत ना. पण हीच मुलं जेव्हा त्यांच्या गरजांमध्ये गुंततात आणि आपल्याला भरवसा राहात नाही, तेव्हा वडिलधाऱ्यांना मानसिक त्रास होतो. त्यामुळे, आपल्या वृद्धापकाळाची जबाबदारी आपली स्वतःची असावी, हे लवकर लक्षात घेणं गरजेचं आहे. कुणी बोलायला नाही अशावेळी नैराश्य येतं, मनाची घालमेल सुरू होते. निवृत्ती ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे.retirement पण तिला स्वीकारणं आणि त्या दिवसांसाठी स्वत:ची तयारी करणं हे आपल्याच हातात आहे. त्यासाठी काही गोष्टी उमेदीच्याच काळात कराव्या लागतात. त्यात प्रथम आर्थिक तजवीज लवकर करण्याची गरज आहे. 40 च्या आसपासपासूनच निवृत्तीचं नियोजन सुरू करा. आरोग्यविमा, बचत, गुंतवणूक, पेन्शन योजनांचा विचार करा. मानसिक दृष्टिकोन बदलवा, निवृत्ती म्हणजे शेवट नव्हे. ती एक नवी सुरुवात आहे. काही छंद जोपासा, जसे की वाचन, संगीत, फिरणे, मित्रांशी गप्पा मारणे. संवाद हे प्रभावी शस्त्र आहे, त्यामुळे संवाद तुटू न देता तो सुरू ठेवा. मुलांना दोष देण्यापेक्षा त्यांच्याशी स्पष्ट संवाद साधा. तुमच्या अपेक्षा आणि गरजा सांगताना प्रेम आणि समजूतदारपणा यांचा वापर करा. स्वत:ला समाजाशी जोडा, पार्क, विविध गट, सामाजिक संस्था याशिवाय जिथं तुमच्यासारखे लोक आहेत, तिथं जा. गप्पा करा. हसणं, बोलणं खूप गरजेचं असतं. वृद्धापकाळात हिरमुसून चालणार नाही, तर स्वतःच्या आयुष्यावर विश्वास ठेवा. तुमचं आयुष्य मुलांवर अवलंबून नको. जे जमेल ते स्वत: करा. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधा म्हणजे निवृत्ती सुद्धा एक आत्मिक समाधानाची अनुभूती देऊन जाईल. निवृत्ती म्हणजे संधी की संकट? शेवटी, निवृत्ती ही संकट नाही, ती एक संधी आहे, स्वतःला पुन्हा एकदा ओळखण्याची. मुलं जबाबदार असतातच, पण तेही माणूस आहेत. त्यांनाही अडचणी असतात. त्यामुळे त्यांच्यावर रागावण्यापेक्षा आपण आपल्या जगण्याला स्वत: आधार देऊया. जेव्हा आपण निवृत्तीला एका नव्या टप्प्याप्रमाणे स्वीकारतो, तेव्हा तो काळ एकटेपणाचा नव्हे, तर समाधानाचा होतो. बघा पटतेय का?
 
9922999588