टिपेश्वर अभयारण्याचा राज्यात तृतीय क्रमांक

02 Jul 2025 19:30:22
तभा वृत्तसेवा पांढरकवडा,
Tipeshwar Sanctuary यवतमाळ जिल्ह्यातील जैवविविधतेने समृद्ध अशा टिपेश्वर अभयारण्याने राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवला आहे. देशातील 438 राष्ट्रीय उद्याने व वन्यजीव अभयारण्य यांच्या करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये टिपेश्वरने देशामधून 44 वा तर महाराष्ट्र राज्यातून तिसरा क्रमांक पटकावला आहे.केंद्र सरकारच्या पर्यावरण व वन मंत्रालयाच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या मूल्यांकनामध्ये टिपेश्वर अभयारण्यास 78.13 गुण मिळाले असून ‘उत्तम व्यवस्थापन’ या श्रेणीत स्थान पटकावले आहे. 1997 मध्ये टिपेश्वर अभयारण्याची घोषणा करण्यात आली होती. हे अभयारण्य 148.62 चौरस किलोमिटर क्षेत्रात पसरले आहे.
 
 
Tipeshwar Sanctuary
 
 
जैवविविधतेने समृद्ध हे अभयारण्य वाघ, बिबट, अस्वल, रानकुत्रे, मोर, चितळ, नीलगाय, काळवीट, घोरपड इत्यादी प्राणी तसेच विविध प्रकारचे पक्षी तसेच दुर्मिळ वनस्पती औषधी वृक्ष यांनी समृद्ध आहे.
टिपेश्वरमधील योग्य व्यवस्थापनामुळे टिपेश्वर अभयारण्य पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून एक महत्त्वाचे स्थळ म्हणून विकसित होऊन नावारूपास आलेले आहे. 2020 ते 2025 या कालावधीत देशभरातील विविध अभयारण्यांमध्ये उपलब्ध सुविधा, संरक्षणाच्या दृष्टीने उपायोजना, विकास कामे व एकूण व्यवस्थापन यांचा अभ्यास करण्यात आला. यासाठी तज्ञांची समिती स्थापन करण्यात आली होती. समितीच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रमुख वासू, सदस्य म्हणून डॉ. रथीन बर्मन, डॉ. रितेश कुमार व डॉ. भिवेश पांडव यांचा समावेश होता.अभयारण्य निर्मितीपासून सर्व अधिकारी, कर्मचारी, वनमजूर यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच अभयारण्यास तृतीय क्रमांक प्राप्त झाल्याची भावना विभागीय वन्यजीव अधिकारी उत्तम फड यांनी व्यक्त केली.
Powered By Sangraha 9.0