नागपूर,
pachpaoli police station nagpur मृत्यू कसा होतो, हे कोणीच पाहिलेले नाही. कारण मृत्यूचा थरार सांगण्यासाठी तो व्यक्ती हयात राहत नाही. मृत्यू चोर पावलांनी येतो, एवढीच काय ती माहिती. परंतु कुणी जिवंतपणीच मृत्यूचा थरार अनुभवला तर? कल्पनाच करता येत नाही. परंतु अशी काहीशी घटना पाचपावली ठाण्यांतर्गत घडली. मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी नागपुरातील (धंतोली) एका तरुणीला, तर केरळमधील एका उच्चशिक्षित युवकाला जीव गमवावा लागला. या घटनेत मात्र त्याने मृत्यूचे रहस्य जाणून घेण्यासाठी नव्हे तर आजाराला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडला. तो गळफास घेणार त्याच वेळी पोलिस पोहोचले आणि त्याला आत्महत्येपासून परावृत्त केले. मृत्यूचा हा थरार पाचपावली ठाण्यांतर्गत बाळाभाऊ पेठ परिसरात घडला.
अनिल तिवारी (57) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांना पत्नी आणि एक मुलगा आहे. ते शासकीय कार्यालयातून निवृत्त झाले. गिट्टी खदान ठाण्याच्या हद्दीत राहतात. त्यांचे दुसरे घर पाचपावलीअंतर्गत बाळाभाऊ पेठ येथे आहे. त्यांना आजार असून असह्य वेदना होतात. आजाराला ते कंटाळले आहेत. त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या दिवशी ते बाळाभाऊपेठ येथील घरी होते. तसे पत्नीला सांगितले होते. त्या दिवशी मुसळधार पाऊस होता. आत्महत्या करण्याची त्यांनी संपूर्ण तयारी केली. त्यासाठी नायलॉन दोरी खरेदी केली. छताला दोरीचा फास बांधला आणि ते गळफास घेण्यासाठी मनाची तयारी करीत होते. दरम्यान शेवटचे बोलावे म्हणून त्यांनी पत्नीला व्हिडीओ कॉल केला. आजाराला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे सांगितले. त्यांचे शब्द आणि दोरीचा फास पाहून पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली.
अन् पोहोचले पोलिस
मुलाने pachpaoli police station nagpur लगेच मोबाईल सर्च करून पाचपावली ठाण्याचा नंबर मिळविला. पोलिसांना फोन करून माहिती दिली. त्यावेळी रात्रीचे 12.20 वाजले असावेत. बीट मार्शल आनंद सग आणि राजू श्रीवास्तव हे कर्तव्यावर होते. त्यांनी लगेच तिवारीच्या पत्नीला फोन करून पतीला फोनवर बोलण्यात गुंतवून ठेवण्यास सांगितले. काही वेळातच सांगितलेल्या पत्त्यावर पोलिस पोहोचले. दार आतून बंद होते आणि केवळ स्लीपर बाहेर होती. तेच घर असल्याचे मुलाने सांगितले. पोलिस दार तोडून आतमध्ये गेले असता अनिल तिवारी फासावर लटकण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी त्याला ठाण्यात आणले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी त्यांचे समुपदेशन केले आणि मुलगा अमनला बोलावून वडिलांना त्याच्या ताब्यात दिले. पोलिसांची कल्पकता आणि क्षणाचाही विलंब न लावल्याने त्यांचा जीव वाचविला. या घटनेची पाचपावली पोलिसांनी नोंद केली.