सेवानिवृत्त पोलिसांचे प्रश्न मार्गी लावू : ना. भोयर

20 Jul 2025 16:55:27
वर्धा,
pankaj Bhoyar कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची प्रमुख जबाबदारी पोलिसांची असते. पोलिस विभागात दिर्घकाळ सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त पोलिसांना सन्मानाने जीवन जगता यावे, यासाठी शासन आपल्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे. सेवानिवृत्त पोलिसांनी मागणी केल्यानुसार आरोग्य, म्हाडांच्या घरांमधील आरक्षण, जिल्हास्तरावर सेलची सुरूवात असे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
 

pankaj Bhoyar  
येथील ओकेझन सेलिब्रेशन हॉल मध्ये सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी सेवा संस्थेच्या वर्धा शाखेचा प्रथम वर्धापन दिन व स्नेहसंमेलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील, प्रभारी पोलिस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, सेवानिवृत्त पोलिस बांधव कल्याणकारी शिखर संस्थेचे अध्यक्ष संपत जाधव, वर्धा शाखेचे अध्यक्ष अरुण झोटींग, कार्याध्यक्ष अंकुश पिंपरे, मिनाक्षी पेठे, नैना डोंगरे उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. भोयर पुढे म्हणाले की, मी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर पोलिस परिसंवाद ही संकल्पना राबविली. पोलिसांच्या परिवारांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांच्या समस्यांची सोडवणूक करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये सर्वात जास्त सदनिका पोलिसांना मिळाल्या आहेत. मागील काळात डी. जी. लोनसाठी अर्जांची पेंडन्सी मोठ्या प्रमाणात होती. अधिवेशनामध्ये डी. जी. लोन सुविधेसाठी आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे डी. जी. लोन अर्जांची पेंडन्सी कमी होऊन लोन लवकर मंजूर होणार आहे, असे ते म्हणाले.
जिल्हास्तरावर सेवानिवृत्त पोलिसांसाठी सेलची स्थापना असेल, म्हाडाच्या घरांमध्ये आरक्षण, सेवानिवृत्त पोलिसांना वैद्यकीय सुविधेचा लाभ अशा अनेक समस्यांची सोडवणूक करण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, असेही ते म्हणाले. यावेळी विशेष पोलिस महानिरीक्षक संदीप पाटील व संपत जाधव यांनी सुद्धा मनोगत व्यत केले. कार्यक्रमास सेवानिवृत्त पोलिस अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Powered By Sangraha 9.0