गांजाची एक खेप तीन हजारांत

गोंडवाना एक्सप्रेसमधून महिलेला अटक,चौकशी करताच घाबरली

    दिनांक :21-Jul-2025
Total Views |
नागपूर,
ganja छत्तीगडच्या रायपूरहून घेतलेली गांजाची खेप तिला दिल्लीला पोहोचवायची होती. यासाठी तिला केवळ तीन हजार रुपये मिळाले. ती गोंडवाना एक्सप्रेसने निघाली. नागपूर रेल्वे स्थानकावर झालेल्या तपासणीत ती लोहमार्ग पोलिसांच्या जाळ्यात अडकली. सुकना मेहरा (40) रा. होशंगाबाद असे अटकेतील महिलेचे नाव आहे. तिच्याकडून एक लाख 14 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयाने तिला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली.
 

नागपूर, ganja 
ओडिशा आणि विशाखापट्टणम्‌‍ येथील जंगलात गांजाची शेती केली जाते. तसेच मध्यप्रदेशच्या काही भागातूनही गांजाची मोठ्या प्रमाणावर तस्करी होते. देशभरात गांजाची खेप पोहोचविण्यासाठी गरीब, गरजू आणि महिलांचा वापर केला जातो. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचविणे एवढीच त्यांच्यावर जबाबदारी असते. यासाठी त्यांना तीन हजार रुपये मिळतात. अटकेतील महिला सुकना हिच्यावरदेखील गांजा पोहोचविण्याची जबाबदारी होती. यासाठी तिला केवळ तीन हजार रुपये मिळाले होते. तिने रायपूरहून गांजाची खेप घेतली आणि गोंडवाना एक्सप्रेसने दिल्लीसाठी निघाली होती. ती बर्थ क्रमांक 32 वरून प्रवास करीत होती. नागपूर रेल्वे स्थानकावर गाडी थांबताच लोहमार्ग पोलिसांनी गाडीचा ताबा घेतला. एक-एक डब्याची झडती घेतली.
कोच बी-3 मधील 28 क्रमांकाच्या बर्थखाली एक ट्रॉली बॅग बेवारस स्थितीत आढळली. पथकाने बॅगसंदर्भात विचारपूस केली. मात्र, बॅगवर कोणीही हक्क सांगितला नाही. त्यामुळे पोलिसांनी बॉम्ब शोध व नाशक पथकाला पाचारण केले. पथकाने तपासणी केली असता घातपात करणारे काहीच नसल्याचे निष्पन्न झाले. बॅगमधून उग्र दर्प येत होता. त्यामुळे बर्थ नंबर 32 वर असलेल्या संशयित महिलेची सक्तीने चौकशी केली असता ती घाबरली आणि खरे काय ते तिने सांगितले. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले. ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. बनम बॅग, ट्रॉली बॅगमध्ये सेलोटेपने बांधलेले चार नग त्यात 7 किलो गांजा, आधारकार्ड, रेल्वे तिकीट, एक मोबाईल असा एकूण एक लाख 14 हजार रुपये किमतीचा महिलेजवळील मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक मंगेश शदे, अपर पोलिस अधीक्षक दत्ताराम राठोड, उपविभागीय अधिकारी पांडुरंग सोनवणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गौरव गावंडे, सपोनि नीलम डोंगरे, पोलिस हवालदार संजय पटले, मजहर अली, शबाना पठाण, ममता तिवारी, मंजूषा खांडेकर आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे चंद्रशेखर मदनकर, बीडीडीएसचे दीपक डोर्लीकर यांनी केली.