चंद्रपूर,
cdcc-bank खरे तर, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची मुहूर्तमेढ जनसंघाच्या लोकांनी केली. पण नंतरच्या काळात या बँकेवर काँगेसचे वर्चस्व स्थापन झाले आणि प्रदीर्घ काळ त्यांनी सत्ता भोगली. पण यंदा पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीने या बँकेची सत्ता पूर्णपणे काबीज केली. मंगळवारी बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचे रवींद्र शिंदे, तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
21 संचालक असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत काँगे्रसला धोबीपछाड देत भाजपाने मोठे सत्तांतरण केले. मंगळवारी, 22 जुलै रोजी शिंदे आणि डोंगरे यांना अविरोध निवडून आणत अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्षपदी विराजमान केले. तब्बल 13 वर्षाच्यानंतर झालेल्या निवडणुकीत सीडीसीसी बँकेतून काँगे्रसला हद्दपार व्हावे लागले आणि ही किमया आ. कीर्तीकुमार भांगडिया आणि आ. किशोर जोरगेवार यांनी करून दाखवली आहे.
या नुतन सत्तास्थापनेच्यावेळी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, भाजपचे आमदार कीर्तिकुमार भांगडिया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे, माजी आमदार सुदर्शन निमकर यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
आधीच 12 संचालक अविरोध निवडूण आले होते. 10 जुलै रोजी बँकेच्या 9 संचालक पदांसाठी निवडणूक झाली. त्यानंतर काँगे्रस व भाजपाने आपल्याकडे बहुमत असल्याचा दावा केला होता. मात्र, ऐनवेळी उबाठाचे रवींद्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसच्या सत्तेचे गणितच बिघडवले आणि भाजपाचा झेंडा फडकवत अध्यक्षपदावर विराजमान झाले. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर याही संचालक म्हणून निवडून आल्या होत्या. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांचे ‘तथाकथित एकत्रिकरण’ही निवडणुकीदरम्यान मोठा चर्चेचा विषय राहिला.cdcc-bank मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही. एकमेकांतून विस्तव जात नसलेल्या या दोन्ही काँगे्रसी नेत्यांची बँकेच्या सत्तेसाठी केलेली ‘एकी’ फोल ठरली.
मुख्यमंत्री फडणवीस यांना ही वाढदिवसाची भेट : आ. भांगडिया
प्रथमच भाजपाने मध्यवर्ती बँकेवर आपला झेंडा फडकवला आहे. या यशाचे श्रेय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाला जाते. त्यांच्याच मार्गदर्शनात ही निवडणूक आम्ही लढवली आणि त्यामुळेच आम्हाला एकहाती यश मिळाले. मध्यवर्ती बँकेत भाजपचा अध्यक्ष होणे ही आमच्याकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाची भेट आहे, अशी विजयी प्रतिक्रिया आ. बंटी भांगडिया यांनी यावेळी दिली.
आता भ्रष्टाचाराविरोधी मोहीम राबवू : रवींद्र शिंदे
बँकेत ज्यांनी भ्रष्टाचार केला, त्यांच्याविरुद्ध मी स्वतः संचालक या नात्याने तक्रार केली आहे. हे सर्व ‘रेकॉर्ड’वर आहे. ही शेतकर्यांची बँक आहे आणि त्यांचा हित जोपासण्याचे काम आम्ही 20 वर्षांपासून करीत आहोत. जे दोषी असतील, त्यांना शिक्षा होईल. बँकेमार्फत विकासकामे केली जातील आणि प्रत्येक शेतकर्याला समान वागणूक मिळेल, अशी प्रतिक्रीया चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे नवनियुक्त अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी दिली.