नागपूर,
safety of female student पहाटे तीन वाजताच्या सुमारास दोन युवक अचानक त्या मुलीच्या खोलीत गेले. स्पर्शाने तिची झोप उघडली. दोन युवकांना समोर पाहून तिची बोबडीच वळली. तिचा मोबाईल घेऊन दोन्ही युवक पळाले. विद्यार्थिनींच्या सुरक्षेवर प्रश्न निर्माण करणारी ही गंभीर घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याअंतर्गत शासकीय मुलींच्या वसतिगृहात मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दोन अज्ञात युवकांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे वसतिगृहातील मुली भयभीत झाल्या असून त्यांना रात्र काढणे कठीण झाले आहे. आम्हाला सुरक्षा पाहिजे, एवढीच त्यांची अपेक्षा आहे.
हिंगणा मार्गावर आयसी चौकात असलेल्या गायत्री प्लाझा नावाच्या व्यावसायिक इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या माळ्यावर शासकीय मुलींचे वसतिगृह आहे. या वसतिगृहात एकूण 64 विद्यार्थिनी राहतात. रात्रीच्या वेळी देखरेखीसाठी एक चतुर्थ कर्मचारी (महिला) आणि वॉर्डनही येथे असतो. पीडित विद्यार्थिनी अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. घटनेच्या दिवशी पीडित मुलगी तिच्या खोलीत एकटी झोपली होती. तिच्यासोबत त्या खोलीत राहणारी दुसरी विद्यार्थिनी सुटी घेऊन घरी गेली होती. पहाटे 3 वाजताच्या सुमारास इमारतीच्या मागील दारातून दोन तरुण परिसरात दाखल झाले. झोपण्यापूर्वी पीडिता दाराची कडी लावायला विसरली होती. याचाच फायदा घेत आरोपी पीडितेच्या खोलीत शिरले. तेथे टेबलवर ठेवलेला मोबाईल उचलला. दरम्यान त्यांची नजर गाढ झोपेत असलेल्या पीडितेवर पडली. त्यांच्या मनात विकृती निर्माण झाली. त्यांनी पीडितेला स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शाने पीडितेची झोप उघडली. समोर दोन अनोळखी तरुणांना पाहून ती घाबरली. तिच्या तोंडून शब्दच फुटत नव्हते. अखेर हमत करून तिने आरडाओरड केली. आरोपींनी मोबाईल उचलत तेथून पळ काढला. पीडितेचा ओरडण्याचा आवाज ऐकून इतर विद्यार्थिनी आणि वॉर्डनने खोलीकडे धाव घेतली. मात्र आरोपी पसार झाले होते.
मागील दाराला कुलूपच नाही
घटनेची माहिती एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. सुरुवातीला केवळ मोबाईल चोरीची माहिती देण्यात आली. मात्र नंतर विद्यार्थिनीचा विनयभंग झाल्याचेही समोर आले. या घटनेने वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये हे वसतिगृह व्यावसायिक इमारतीमध्ये भाड्याच्या जागेत स्थानांतरित करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील दाराला नेहमी कुलूप असते. मात्र पाच दिवसांपूर्वी परिसरात अतिशय दुर्गंधी पसरली होती. सफाई करण्यासाठी कुलूप तोडण्यात आले. तेव्हापासून नवीन कूलुप लावण्यात आले नाही.
आरोपींना लवकरच अटक करू
मुलींच्या वसतिगृहात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून एकही सीसीटीव्ही कॅमेरा लागलेला नाही. पोलिस निरीक्षक गोकुल महाजन यांनी सांगितले की, वेगवेगळी पथके आरोपींचा शोध घेत आहेत. प्राथमिक तपासात आरोपी चोरीच्या उद्देशातून आल्याचा अंदाज होता. मात्र नंतर विनयभंगाचाही प्रकार पुढे आला. हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे आणि लवकरच आरोपींना अटक केली जाईल. सुरक्षेच्या दृष्टीने समाज कल्याण विभागाला उपाययोजना करण्यासाठी पत्र लिहिण्यात येईल.