२५ हजारांची लाच घेतांना जिल्हा पुरवठा अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले

    दिनांक :24-Jul-2025
Total Views |
बुलढाणा,
bribe शासनाच्य हमी केंद्रावर ज्वारी विक्री केलेल्या शेतकर्‍याला बिल अदा करण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारीकडून ७० हजार रूपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली. याप्रकरणी २५ हजार रुपयांची पहिली रक्कम घेतांना जिल्हा पुरवठा अधिकारी गजानन नंदकिशोर टेकाळे याला त्याच्या सहकार्‍यासह रंगेहाथ पकडण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयातच लाच लुचपत विभागाच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला. या कारवाईनंतर महसुल विभागासह जिल्हा प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे याच्या चिखली निवासस्थानाची झाडाझडती घेतली.
 

District supply officer caught red-handed while taking a bribe of Rs 25,000 
लाच लुचपत विभागाने दिलेल्या पत्रकानुसार धाड परिक्षेत्रातील एका शेतकर्‍याने शासनाच्या हमी भाव केंद्रावर विक्री केली आहे. या ज्वारीचे बिल निघण्यास कोणतीही अडचण येवू नये यासाठी तसेच भविष्यात ज्वारी विक्रीची प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकार्‍याकडून ७० हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. विशेष म्हणजे यासदंर्भात लाच लुचपत विभागाच्या पथकाने २१ जुलै आणि २२ जुलै असे दोन दिवस खातरजमा केली. जिल्हा पुरवठा अधिकारी टेकाळे यांना तडजोडीअंती ५० हजार रुपये देण्याचे निश्चीत झाले. त्यातील २५ हजार रूपये लाचेचा पहिला हप्ता येवून शेतकरी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात दि. २३ जुलै रोजी पोहोचला. लाचलुचपत पथकानेही कार्यालयात सापळा रचला होता.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्याच्यासोबतच खंडागळेलाही ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. दरम्यान लाचलुचपत विभागाच्या एका पथकाने टेकाळेच्या चिखली येथील निवासस्थानाची झाडाझडती घेतली. त्याठिकाणी मात्र रोख रक्कम मिळून आली नाही. लाच लुचपत विभागाच्या या यशस्वी कारवाईत विभागाचे पोलिस उपअधिक्षक भागोजी चोरमले यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक रमेश पवार, पोलिस निरीक्षक विलास गुंसीगे, सहाय्यक फौजदार शाम भांगे, हेकाँ प्रविण बैरागी, राजेंद्र क्षीरसागर, पोना जगदीश पवार, रंजीत व्यवहारे, शैलेश सानेवणे, गजानन गाल्डे, पोका स्वाती वाणी, नितिन शेटे यांच्या पथकाने पार पाडली.