ई-समर्थ अंमलबजावणीत विद्यापीठ महाराष्ट्रातून तिसरे

24 Jul 2025 14:41:39
नागपूर,
RTM Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ई-समर्थ प्रणाली अंमलबजावणीत महाराष्ट्रात तिसऱ्या स्थानी आहे. विद्यापीठाने आयटी सेलच्या माध्यमातून ई-समर्थचे ३६ मॉड्यूल्स लागू केले आहे. त्यामुळे विद्यापीठातील बहुतांश कामे डिजिटल प्रणाली द्वारे होत असल्याने विविध कार्यांना गती मिळाली आहे.
 

RTM Nagpur University  
देशभरातील शैक्षणिक संस्थांचे कार्य अधिक गतीने व्हावे याकरिता केंद्र सरकारने २०२२ पासून ही समर्थ प्रणाली लागू केली आहे. केंद्र सरकार तसेच राज्य सरकारच्या निर्देशानुसार विद्यापीठाने देखील २०२२ पासून ई-समर्थ प्रणाली टप्प्याटप्प्याने लागू करण्यास सुरुवात केली. विद्यापीठाच्या आयटी सेलच्या माध्यमातून आतापर्यंत एकूण ४० पैकी ३६ मॉड्यूल्स लागू केले आहे. यामध्ये परीक्षा, प्रशासन, वित्त व लेखा, विद्या विभाग आदी विभागांचा समावेश आहे. ई -समर्थ प्रणालीच्या माध्यमातून परीक्षा विभागातील बहुतांश कामे ऑनलाइन पद्धतीने तसेच डिजिटली केले जात असल्याने विद्यार्थ्यांना देखील त्यांची विविध प्रमाणपत्रे कमी वेळेत उपलब्ध होत आहे. त्याचप्रमाणे प्रशासनातील बहुतांश कामे या प्रणालीच्या माध्यमातून होत असल्याने प्रशासकीय कामकाजात गती आली आहे. प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली नोडल ऑफिसर डॉ. श्वेता बारहाते व समन्वयक सतीश शेंडे हे ई-समर्थ प्रणालीचे योग्य प्रकारे कार्यान्वयन करीत आहेत. आयटी सेलच्या माध्यमातून ई समर्थ मधील बहुतांश संगणकीय व तांत्रिक कामे केली जात आहे. या प्रणालीमुळे विद्यापीठ प्रशासनाच्या कार्याला गती आली असून विविध कामे गतीने होत आहे. संकेतस्थळ, नेटवर्किंग, शैक्षणिक, प्रशासकीय कार्यालय आदी विविध ठिकाणी संगणकीय सर्व कामे या ई-समर्थ मॉड्यूल्सच्या माध्यमातून आयटी सेलच्या टिमकडून केल्या जात आहे.
Powered By Sangraha 9.0