झोपेची डुलकी, समृद्धीवर दोन ट्रकचा अपघात

24 Jul 2025 21:06:55
वर्धा, 
two-trucks-collide : पहाटेच्या सुमारास चालकाला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटून भरधाव ट्रक समोरील ट्रकवर आदळला. यात दोन्ही ट्रकचे चालक आणि एक लीनर जखमी झाला. हा अपघात समृद्धी महामार्गावर नागपूर कॉरीडोअर, सेलू पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज २४ रोजी पहाटे ४ वाजता झाला. ट्रकचालक लकपती साकेत (३०), सिबलू पाल (२२), लीनर अनिलकुमार पाल (२०), अशी जखमींची नावे आहेत.
 
 

JLK 
 
 
लकपती सांकेत हा एम. एच. ०५-एफजे ०३८६ या क्रमांकाचा ट्रक घेऊन मुंबईहून नागपूरच्या दिशेने पार्सल घेऊन जात होता. तर मागाहून येणारा यूपी ७०-पीटी १७९१ या क्रमांकाचा ट्रक मुंबईहून नागपूरच्या दिशेने भाजीपाला घेऊन जात होता. ट्रकचालक सिबलू पाल याला डुलकी लागल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव ट्रक समोरील ट्रकवर आदळला.
 
 
अपघाताची माहिती मिळताच समृद्धी महामार्गावरील मदत चमूने घटनास्थळ गाठले. त्यावेळी मागील ट्रकचा चालक केबिनमध्ये फसून दिसला. त्याला बाहेर काढून रेस्यू केले. जखमींना सावंगी येथील आचार्य विनोबा भावे रुग्णालयात दाखल केले आहे. मयूर दरणे, पंकज खरकाडे, दुर्वेश वानखेडे, अमर बुध यांनी दोन्ही वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी सेलू पोलिसांनी गुन्हा नोंद केला.
Powered By Sangraha 9.0