नवी दिल्ली,
Lightning effect on forests जगभरात जंगलांमध्ये वीज पडल्यामुळे झाडांचे होणारे नुकसान हे केवळ अपघाती घटना म्हणून न पाहता, पर्यावरणीय संकट म्हणून पाहण्याची वेळ आली आहे. 'ग्लोबल चेंज बायोलॉजी' या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात नुकताच प्रकाशित झालेला अभ्यास याबाबत चिंता व्यक्त करतो. जर्मनीतील म्युझिक टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या या अभ्यासानुसार, संपूर्ण जगातील वनस्पती बायोमासच्या नुकसानीपैकी सुमारे दोन ते तीन टक्के नुकसान वीज पडल्यामुळे होते.
या अभ्यासातून असेही समोर आले आहे की, जंगलातील आगींमध्ये वनस्पती जळल्यामुळे दरवर्षी जवळपास १.२६ अब्ज टन कार्बन डायऑक्साईड वातावरणात उत्सर्जित होते. वीज पडणे ही पावसाळ्यातील एक सामान्य नैसर्गिक घटना असली, तरी त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. विशेषतः उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये वीज पडल्यामुळे झाडांची नासधूस मोठ्या प्रमाणावर होत आहे. आतापर्यंत वीज पडून दरवर्षी किती झाडे नष्ट होतात, याचा स्पष्ट अंदाज नव्हता. मात्र या नव्या संशोधनामुळे वीजमुळे होणाऱ्या झाडांच्या हानीचे प्रमाण अधिक अचूकपणे मोजता येणे शक्य झाले आहे.
संशोधकांनी Lightning effect on forests यासाठी पहिली विशिष्ट मोजमाप प्रणाली विकसित केली असून, त्याद्वारे केवळ नष्ट होणाऱ्या झाडांची संख्या नव्हे तर वीजमुळे सर्वाधिक परिणाम झालेली स्थळेही ओळखता येणार आहेत. जागतिक पातळीवर वीज पडल्यामुळे जंगलांतील झाडांच्या होणाऱ्या नुकसानीचा आणि त्या अनुषंगाने होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा हा पहिलाच व्यापक अंदाज असल्याचे अभ्यासकांनी स्पष्ट केले आहे.या पार्श्वभूमीवर विविध प्रकारच्या जंगलांमध्ये वीज पडण्याचे पर्यावरणीय परिणाम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. वाढत्या तापमान, बदलत्या हवामान आणि जंगलांवरील वाढत्या मानवी हस्तक्षेपाच्या पाश्र्वभूमीवर, वीज पडण्याच्या घटनांचे प्रमाण आणि तीव्रता अधिक गंभीर रूप धारण करू शकते, अशी इशारा देणारी ही शास्त्रीय नोंद आहे.