सावंगीच्या दंत रुग्णालयात कृत्रिम दंतोपचार

जन्मतः नसलेल्या दातांचे बेसल इम्प्लांटद्वारे पुनर्वसन

    दिनांक :25-Jul-2025
Total Views |
वर्धा, 
artificial-teeth-treatment जन्मतःच नसलेल्या दातांमुळे दैनंदिन जीवनात नैराश्य आलेल्या स्थानिक १८ वर्षीय तरुणीला आत्मविश्वास आणि जगण्याची नवी उमेद देणारे उपचार सावंगी मेघे येथील शरद पवार दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या कृत्रिम दंत शल्यचिकित्सा विभागात करण्यात आले. बेसल इम्प्लांटद्वारे दंतरोपण होऊन चेहरा अधिक सुबक झाल्याने तिच्या ओठांवर स्मितहास्य फुलले.
 

vhmv 
 
स्थानिक तरुणीला जन्मापासूनच वरच्या जबड्यात उजव्या आणि डाव्या पटाशीचे दात आलेले नव्हते. या दातांच्या अभावामुळे तिचे बोलणे अस्पष्ट झाले होते. खळखळून हसण्यालाही नकळत मर्यादा आल्या. त्यातून आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊन दिवसेंदिवस तिचा लाजाळूपणा वाढत चालला होता. वयात येताना स्वतःच्या दिसण्याबाबत ती सतत नाखूष राहू लागली. जन्मतः नसलेले दात नव्याने बसविण्यासाठी ही युवती सावंगीच्या दंत रुग्णालयात दाखल झाली. तिच्या चेहर्‍याची वैद्यकीय आणि क्ष किरण तपासणी केली असता पारंपरिक इम्प्लांटना आधार देण्यासाठी समोरच्या जबड्यात पुरेसे हाड उपलब्ध नसल्याचे आढळून आले. अशा रुग्णांची गणना फाटलेले ओठ आणि दुभंगलेला जबडा असलेल्या रुग्णांमध्ये केली जाते. हाडांच्या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी अशावेळी बेसल इम्प्लांट हा उपचार पर्याय निवडला जातो. बेसल इम्प्लांट बेसल हाडात बसवले जातात. दंत शल्यचिकित्सकांनी हा पर्याय निवडत तिच्या जबड्यात कृत्रिम दंतरोपण करण्याचा निश्चय केला. दंतरोपणासाठी सिरेमिक सीएडी सीएएम बनावटीचे लिथियम डिसिलिकेटमध्ये कृत्रिम दात तयार करण्यात आले आणि जन्मतः नसलेल्या या दातांच्या जागेवर कृत्रिम दातांचे पुनर्वसन यशस्वीरित्या करण्यात आले.artificial-teeth-treatment त्यासाठी नवतंत्रज्ञानाचा वापर करीत दोन इम्प्लांट जबड्यात बसवण्यात आले. या प्रगत उपचार प्रक्रियेत विभागप्रमुख डॉ. सुरेखा गोडबोले, डॉ. भूषण मुंदडा, डॉ. माधवी सेलुकर, डॉ. सीमा साठे कंबाला यांचा सहभाग होता.
 
या उपचारांनी तरुणीच्या ओठांवर हसू फुलले असून ती समाजात अधिक उत्साहाने व आत्मविश्वासाने वावरू शकेल. जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणणारे आणि दीर्घकाळ टिकणारे हे उपचार नवीन तंत्रज्ञानामुळे शय झाले आहे, असे शरद पवार दंत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मनोज चांडक यांनी सांगितले