यवतमाळ
Sanjay Rathod आजचे युग कौशल्यावर चालते. त्यामुळे युवकांनी रोजगार स्वयंरोजगार मिळविण्यासाठी आवश्यक कौशल्य आत्मसात केले पाहिजे. प्रत्येकजन आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वप्न पाहत असतात. असे स्वप्न पूर्ण होण्यासाठी युवकांनी परिशमाची जोड दिली पाहिजे, असे प्रतिपादन पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यावतीने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आमदार बाळासाहेब मांगुळकर, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, सहायक आयुक्त प. भ. जाधव उपस्थित होते.
सध्याच्या युगात शिक्षण घेऊनही अनेक तरुणांना रोजगार, नोकरी मिळत नाही. त्यामुळे शिक्षणासोबतच कौशल्य विकास देखील आवश्यक आहे. आजचे जग केवळ डिग्री, शिक्षणावर चालत नसून कौशल्य विकसित केल्यास अधिक चांगल्या संधी आपण मिळवू शकतो. या मेळाव्यात विविध कंपन्या थेट आपल्या दारात नोकèया घेवून आल्या आहेत, संधी आपल्या दारातच आहे, असे पालकमंत्री पुढे म्हणाले.
छोट्यापासून सुरुवात करत मोठे ध्येय गाठा. शासनाने आपल्यासाठी अनेक योजना आणल्या असून यापैकीच एक मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आहे. शासकीय, खाजगी कार्यालयामध्ये कामाची संधी मिळून विद्यावेतन देखील या योजनेतून दिले जाते, असेही ते म्हणाले.
जे उमेदवार स्वयंरोजगार करू इच्छितात अशा युवकांना देखील शासन मदत करते. स्टार्टअपच्या माध्यमातून नवउद्योजकाना संधी दिली जाते. विविध कर्ज देणारी महामंडळेसुद्धा यासाठी काम करतात. त्यामुळेच स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मेहनत करा, मोठे व्हा, असे पालकमंत्र्यांनी युवकांशी संवाद साधताना सांगितले.मेळाव्यामध्ये सहभागी 14 नामांकित कंपन्यांनी त्यांच्याकडील 470 रिक्त पदांकरिता नोकरी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. कार्यक्रमाचे संचालन सीमा खिरोडकर यांनी केले.