मुंबई,
Tanushree Dutta अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकताच एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्यात तिला होत असलेल्या मानसिक त्रासाविषयी तिने मोकळेपणाने सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये तनुश्रीने असा आरोप केला आहे की, तिच्या आयुष्यातही जणू सुशांत सिंग राजपूतप्रमाणेच घटना घडत आहेत आणि ती एक खास लॉबीकडून टार्गेट केली जात आहे.
तनुश्री म्हणाली की, ती गेल्या काही दिवसांपासून मोठ्या मानसिक तणावात आहे. तिच्या घरात काम करणारी मोलकरीण अचानक न सांगता कामावर येणे बंद करते, सुरक्षा रक्षक अचानक बदलले जातात, कोणतीही पूर्वसूचना न देता सुरक्षा कंपनी बदलली जाते. हे सर्व प्रकार अतिशय संशयास्पद असून तिच्या एकट्या व्यक्तीला लक्ष्य करण्याचा प्रयत्न असल्याचे ती म्हणते.
तनुश्रीने Tanushree Dutta सांगितले की, "सुशांत सिंगसोबत जे घडले, तेच माझ्यासोबत घडत आहे. सुशांतच्या आजूबाजूच्या लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने दूर केलं गेलं. त्याला एकटं पाडण्यात आलं. त्याच्यासोबत मानसिक खेळ खेळण्यात आले. मी सध्या तशाच परिस्थितीतून जात आहे. लोक मला मानसिकदृष्ट्या अस्वस्थ करण्याचा प्रयत्न करत आहेत."या प्रकरणात ती पोलिसांपर्यंत जाण्याच्या तयारीत असून ती येत्या सोमवारी तिच्या वकिलासह आणि काही विश्वासू मित्रांसोबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करणार असल्याचेही तिने जाहीर केले.
तनुश्रीने यापूर्वीही बॉलिवूडमधील काही शक्तिशाली व्यक्तींविरोधात आवाज उठवला आहे. तिने अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर त्रास दिल्याचा आरोप केला होता. ती म्हणते, "नाना पाटेकर यांचा या सर्व गोष्टींमध्ये सहभाग आहे. ते एकटे नाहीत, त्यांच्या पाठीमागे एक मोठं माफिया नेटवर्क आहे. हेच लोक आता पुन्हा मला लक्ष्य करत आहेत."
तनुश्री दत्ताने व्यक्त केलेल्या या भावना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पसरत आहेत. बॉलिवूडमधील दबाव, मानसिक त्रास आणि अशा लॉबींच्या कार्यपद्धतीविषयी पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत