उदयपूर दंत महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या!

महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप

    दिनांक :25-Jul-2025
Total Views |
उदयपूर,
udaipur-pacific-dental-college : उदयपूरमधील बेदला परिसरात असलेल्या पेसिफिक डेंटल कॉलेजमध्ये बीडीएस अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उशिरा समोर आली आहे. श्वेता सिंग असे या विद्यार्थिनीचे नाव असून, ती हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत तिच्या रूममेटला आढळली. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. तातडीने तिला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तिचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
 
 
udaypur
 
 
 
या प्रकरणाने संपूर्ण महाविद्यालयात आणि परिसरात खळबळ उडवली आहे. श्वेता हिच्या रूममेटला मिळालेल्या सुसाइड नोटमध्ये तिने कॉलेजच्या दोन शिक्षकांवर मानसिक छळाचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपांमुळे संस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले असून विद्यार्थ्यांनी न्यायासाठी आंदोलन सुरू केले आहे.
 
शुक्रवारी सकाळी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात निदर्शने करत श्वेतासाठी न्यायाची मागणी केली. त्यांच्या मते, श्वेतावर दीर्घकाळ मानसिक दबाव टाकला जात होता. अभ्यासक्रमात होत असलेली अनावश्यक विलंब, परीक्षा वेळेत न घेणे, तसेच अपमानास्पद वागणूक यामुळे ती मानसिक तणावात होती. आंदोलक विद्यार्थ्यांचा आरोप आहे की, आता महाविद्यालय प्रशासनच त्यांना आंदोलन थांबवण्यासाठी दबाव टाकत आहे. या पार्श्वभूमीवर सुखेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि विद्यार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू केला.
 
श्वेताने लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये “माही मॅम” आणि “भागवत सर” या दोन प्राध्यापकांची नावं घेत त्यांच्यावर गेल्या दोन वर्षांपासून मानसिक त्रास दिल्याचा आरोप केला आहे. तिने महाविद्यालयातील शिक्षण व्यवस्थेतील गोंधळ आणि व्यवस्थापनाच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. अंतिम वर्षात असूनही श्वेताला कनिष्ठ विद्यार्थ्यांसोबत परीक्षा द्यावी लागल्याचे तिने नमूद केले आहे. इतकेच नव्हे तर काही विद्यार्थी जे नियमित वर्गांना हजरही नव्हते, त्यांना सहज पास केल्याचेही तिने म्हटले आहे.
 
श्वेताने तिच्या पत्रात नमूद केले आहे की, “आमचे सहाध्यायी आधीच इंटर्न बनले आहेत, त्यांना २-३ महिने होऊन गेलेत. पण आम्ही अजूनही अंतिम वर्षातच अडकलेलो आहोत. त्यांनी म्हटलं होतं की दोन महिन्यात परीक्षा घेऊ, पण आता दोन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. देवच जाणे आम्हाला डिग्री कधी मिळेल.” पुढे ती म्हणते, “माझं करिअर त्यांनी संपवलं आहे. मी आता हे सहन करू शकत नाही. हे सगळं पैसे घेण्यासाठी केलं जातं. पैसे दिले तर ठीक, नाहीतर खोट्या गुन्ह्यांत अडकवलं जातं.”
 
शेवटी, श्वेताने न्यायाची मागणी करत लिहिलं की, “जर भारतात खरोखरच न्याय असावा असं वाटत असेल, तर भागवत सर यांना कायमच्यासाठी तुरुंगात टाका. त्यांनी आमच्यावर जे अत्याचार केले, तेच त्यांनाही भोगावे लागावेत.”
 
श्वेता सिंग ही जम्मू येथील रहिवासी असून एका पोलीस कॉन्स्टेबलची एकुलती एक मुलगी होती. तिच्या अचानक जाण्यामुळे संपूर्ण कुटुंब आणि मित्रमंडळींना जबरदस्त धक्का बसला आहे. पोलीस विभागाने याप्रकरणी तपास सुरू केला आहे. संकुलातील संबंधित प्राध्यापकांची चौकशी केली जाणार असून, महाविद्यालयाच्या व्यवस्थापनातील दोषही तपासले जातील. अधिकृत आरोप अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, संस्थात्मक दुर्लक्ष आणि मानसिक छळ या सगळ्या बाजूंची चौकशी केली जाणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.