वर्धा,
Dr. Bhushan Kumar Upadhyay ज्ञान आणि माहितीमध्ये फरक आहे. ज्ञान मानवता शिकवते, संस्कृती दर्शविते, ज्ञान एकमेकांना जोडणे शिकवते. जीवनाचा खरा अर्थ कळण्याकरिता आधी माणूस बनणे आवश्यक. धर्म म्हणजे सत्य जे आहे ते आणि अधर्म म्हणजे असत्य, खोटं. विद्या आपल्याला संकुचीत विचारातून प्रगल्भतेकडे घेऊन जाते असे प्रतिपादन माजी पोलिस आयुत डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले.
जय महाकाली शिक्षण संस्था व अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन्सच्या वतीने बुधवार २६ रोजी अग्निहोत्री महाविद्यालयातील शिवशंकर सभागृह येथे मातोश्री स्व. राणीबाई अग्निहोत्री यांच्या स्मृतिदिनानिमित्त विद्यार्थी गुणगौरव समारोहात बोलत होते. विशेष अतिथी म्हणून नागपूर उच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ आनंद परचुरे यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी पं. शंकरप्रसाद अग्निहोत्री होते.
ते पुढे म्हणाले की, जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर धर्माचे म्हणजेच सत्याचे पालन केले पाहिजे. तुम्ही सत्याच्या मार्गाने चालाल तर तुमच्यावर ईश्वराची कृपा व आशीर्वाद प्राप्त होतो असे उपाध्याय म्हणाले.ज्येष्ठ विधीज्ञ परचुरे म्हणाले की, जीवनात नशिबाला खूप महत्त्व आहे. कधी कधी आपण जे ठरवतो ते प्राप्त न होता जे नशिबात आहे तेच मिळते. परंतु, याचा अर्थ असा होत नाही की काहीही प्रयत्न न करता केवळ नशिबावर विसंबून राहणे. जीवनात यश मिळण्याकरिता कठोर परिश्रम, प्रामाणिकता, जिद्द व चिकाटी आवश्यक आहे असे ते म्हणाले.
पं. अग्निहोत्री यांनी श्रमा शिवाय फळ नाही. जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर कठोर श्रम, परिश्रम, मेहनत करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा बुद्धीचा उपयोग केवळ स्वतःच्या उन्नती करिता न करता जगत कल्याणकरिता करावा. सत्य आणि असत्य काय याचा भेद करून सत्य ओळखनारी मनाची शक्ती म्हणजेच विवेक. विद्यार्थ्यांनी ज्ञानी असल्यासोबतच विवेकी असले पाहिजे ते म्हणाले.
संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री म्हणाले की, जरी आजची मुलांची पिढी हुशार, बुद्धिमान वाटत असली तरी त्यांच्या मध्ये माता, पिता व गुरु यांच्या प्रति आदर, मान सन्मान हा कमी झालेला दिसत आहे. त्यामुळे माता पित्याने आपल्या मुलांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागू देताना त्यांच्यातील संस्कार व माता पित्या बद्दल आदर कमी होणार नाही याची काळजी घेणे व त्याकरिता मुलांचे उत्तम संगोपन करणे आवश्यक आहे असे ते म्हणाले.
संचालन प्राचार्य डॉ. चंद्रकांत कोठारे यांनी केले तर आभार प्रा. अभिषेक सिंह यांनी मानले.या कार्यक्रमात संस्थेच्या विविध महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना गौरवन्वित करण्यात आले.
यावेळी श्रीराम शर्मा, प्राचार्य डॉ. गजानन जंगमवार, डॉ. दीपक पुनसे, डॉ. निरजसिंह यादव, डॉ. प्रसाद जुमळे, डॉ. दिनेश वंजारी, डॉ. रितेश सुळे, डॉ. प्रिया मिश्रा, प्रा. स्वरा अष्टपुत्रे, गजानन दांदडे, राहुल चोपडा, अभिजित रघुवंशी, आदींसह विद्यार्थी व पालकांची उपस्थिती होती.