कारगिल विजयदिन समर्पणाची भावना निर्माण करणारा दिवस : तडस

26 Jul 2025 19:37:19
देवळी,
Ramdas Tadas कारगिलच्या लढाईत आपल्या सैन्यांनी अत्यंत विपरित परिस्थितीत विजय मिळविला. हे युद्ध जगातील अप्रतिम मानले जाते. देशाकरिता सर्वकाही हे भावना रुजवणारे हे युद्ध आहे. आज देशाला युवा नेतृत्वाची गरज असून कारगिल विजयदिन युवा पिढीत समर्पणाची भावना निर्माण करणारा दिवस आहे, असे प्रतिपादन माजी खासदार रामदास तडस यांनी केले.
 

Ramdas Tadas  
माहिती व प्रसारण मंत्रालय भारत सरकारच्या केंद्रीय संचार ब्युरो, क्षेत्रीय कार्यालय वर्धा, २१ महाराष्ट्र बटालियन एनसीसींतर्गत स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयातील एनसीसी युनिट, प्रहार समाज जागृती संस्था यांच्या संयुत वतीने स्थानिक एसएसएनजे महाविद्यालयात आयोजित कारगिल विजय दिवस समारंभात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय अधिकारी हंसराज राऊत, प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, प्रा. डॉ. प्रभाकर ढाले व एनसीसी अधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.
कारगिल विजय दिवस निमित्त महाविद्यालय परिसरात असलेल्या कारगिल स्मृती स्तंभास एनसीसी छात्र सैनिकांनी रायफल सलामी देऊन मानवंदना दिली. प्राचार्य डॉ. सुनीता सोनारे यांनी आपल्या शहीद वीरांच्या आयुष्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढीने सैन्य दलात प्रवेश करून देश सेवा करावी, असे आवाहन केले. कॅप्टन मोहन गुजरकर यांनी कारगिल युद्धातील प्रसंगावर वीर गाथा सादर केली.
कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित चित्रकला, निबंध, देशभती गीत गायन, देशभती समूह गीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना स्मृतीचिन्ह, बक्षीस व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमात कारगिल युद्धात शहीद झालेले कॅप्टन मनोज पांडे, कॅप्टन विक्रम बत्रा, सुभेदार संजय कुमार, कॅप्टन योगेंद्रसिंग यादव, लेफ्टनंट बलवंत सिंग व कॅप्टन सौरभ कालिया यांच्या कारगिल युद्धातील पराक्रमावर आधारित कारगिलचे अभिमन्यू या विषयावर छात्रसैनिकांद्वारे शौर्य गाथा सांगणारी नाटिका सादर करण्यात आली.
प्रास्ताविक केंद्रीय संचार ब्युरोचे क्षेत्रीय प्रचार अधिकारी हंसराज राऊत यांनी केले. संचालन साक्षी पारिसे यांनी केले तर आभार पायल चौके यांनी मानले.
Powered By Sangraha 9.0