अमृतभारत, वंदेभारतची देखभाल आता मोतीबाग कारखान्यातच!

27 Jul 2025 13:20:40
शैलेश भोयर
नागपूर,
Vande Bharat,Amrit Bharat train रेल्वेच्या मोतीबाग येथील वर्कशॉप (कारखाना) मध्ये केवळ नॅरोगेज कोचची (बोगी) देखभाल, दुरुस्ती व्हायची. नॅरोगेज बंद झाल्याने कारखान्यात कामही कमी झाले. त्यामुळे कर्मचारी अतिरिक्त ठरत होते. मोतीबाग कारखाना गुंडाळला जातो की काय? अशी कर्मचाऱ्यांच्या मनात भीती निर्माण झाली. मात्र, दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांनी मोतीबाग कारखाना पुन्हा जिवंत झाला. आता या वर्कशॉपमध्ये ब्रॉडगेज गाड्यांच्या कोचची मोठ्या प्रमाणावर देखभाल दुरुस्ती केली जाते. यापुढे अमृतभारत, वंदेभारत आणि मेमू, एलएचबी आणि आयसीएफ कोचची देखभाल दुरुस्ती मोतीबाग वर्कशॉपमध्ये होईल. त्यासाठी 377 कोटींचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठविण्यात आला. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळताच या कामाला सुरुवात होणार आहे. नागपूरसाठी ही अतिशय अभिमानाची बाब असून या कामामुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरीत्या जवळपास पाच हजार लोकांना रोजगार उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 
Vande Bharat,Amrit Bharat train
 
- पाच हजार लोकांना होईल रोजगार उपलब्ध!
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रयत्नांनी उपरोक्त प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविण्यात आला आहे. प्रस्तावाला लकरच मंजुरी मिळेल, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे. कोचच्या देखभाल दुरुस्तीसाठी जवळपास 150 कोटींची वेगवेगळी अत्याधुनिक यंत्रसामुग्री खरेदी करण्याचा प्रस्ताव आहे. या नवीन यंत्रांच्या माध्यमातून कोच दुरुस्तीची क्षमताही वाढेल. या वर्कशॉला लागणारे सुटे भाग बाहेरून नव्हे तर बुटीबोरी, एमआयडीसी येथूनच खरेदी केले जातील. त्यामुळे येथील कंपन्यांना अतिरिक्त काम मिळेल. रेल्वेत प्रशिक्ष्ाण तसेच आयटीआय प्रशिक्षण प्राप्त कुशल युवक-युवतींना देखील प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या काम उपलब्ध होईल. देखभाल-दुरुस्तीसाठी लागणारे साहित्य आणि त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांनाही प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रीत्या काम मिळेल. एकंदरीत नागपूरसाठी ही अभिनामाची बाब ठरणार आहे. सध्या एलएचबी आणि आयसीएफ कोच दुरुस्तीसाठी भोपाळ, मुंबई आणि चेन्नईच्या पेरंबूर येथे पाठविल्या जातात. ही व्यवस्था नागपुरातच सुरू झाल्यास वेळ आणि पैसा वाचेल.
 
 

दिवसाला 50 चाकांची होईल दुरुस्ती!
 
 
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या मोतीबाग वर्कशॉपमध्ये दिवसाला 18 ते 20 चाकांची देखभाल, दुरुस्ती केली जाते. अत्याधुनिक 24 यंत्रे येणार आहेत. त्यामुळे चाक दुरुस्तीची क्षमता वाढून दिवसाला 50 होईल. म्हणजे अडीच पटींनी क्षमता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
 

2024-25 मध्ये 371 कोचची दुरुस्ती
 
कोचची देखभाल आणि दुरुस्ती करण्याची क्षमता प्रत्येक वर्षाला वाढत आहे. 2024-25 मध्ये सर्वाधिक म्हणजे 371 कोचची दुरुस्ती करण्यात आली. 2019-20 मध्ये -48, 2021-22 मध्ये 58, 2021-22 मध्ये 70, 2022-23 मध्ये 106, 2023-24 या वर्षात 310 तर चालू वर्षात (तीन महिन्यात) 108 कोचची दुरुस्ती करण्यात आली. या वर्षात 500 बोगींच्या दुरुस्तीचे लक्ष्य आहे.
Powered By Sangraha 9.0