डायग्नोस्टिक सेंटरमधून आत्मनिर्भर भारताची अनुभूती

28 Jul 2025 11:47:32
नागपूर,
Bhanutai Gadkari स्व. भानुताई गडकरी मेमोरिअल डायग्नोस्टिक सेंटरमध्ये उपलब्ध असलेल्या सर्व यंत्रांची निर्मिती भारतातच झाली आहे. या डायग्नोस्टिक सेंटरच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची अनुभूती येथे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. लष्करीबाग (कमाल चौक) येथे स्व. भानुताई गडकरी मेमोरिअल डायग्नोस्टिक सेंटरच्या लोकार्पणप्रसंगी फडणवीस बोलत होते.
 
 

Bhanutai Gadkari 
 
 
 
गरीब रुग्णांसाठी अत्यंत माफक दरात निदान
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री, नितीन गडकरी होते. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री सुलेखा कुंभारे, महाबोधी सोसायटी, बंगळुरूचे जनरल सेक्रेटरी भंते आनंद थेरो, रामकृष्ण मठचे अध्यक्ष स्वामी राघवेंद्र, रा. स्व. घाचे महानगर संघचालक राजेश लोया, ए. एम. टी. झेड. व्यवस्थापकीय संचालक (विशाखापट्टणम) डॉ. जितेंद्र शर्मा, भाजपा शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांच्यासह आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार संदीप जोशी, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार आशीष देशमुख यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
 
 
चाळीस प्रकारच्या तपासण्या केवळ तीनशे रुपयांत
गरीब रुग्णांना कमी पैशांत निदान आणि उपचार करता यावे, याच उद्देशाने हे केंद्र सुरू केले आहे. या केंद्रात 40 प्रकारच्या तपासण्या केवळ 300 रुपयांत करता येतील. त्यामुळे या केंद्राचा गरिबांनी जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.गडकरी म्हणाले, माझ्या आईचा आशीर्वाद कायम माझ्यासोबत आहे. आजपर्यंत मी जे काही करू शकलो, ते आईचे आशीर्वाद आणि तिच्या संस्कारांमुळेच शक्य झाले. गरिबांची सेवा करण्याचे संस्कार आईने मला दिले. त्यामुळे मी पहिल्यांदा आमदार झाल्यापासून आजपर्यंत हजारो रुग्णांचे हृदयाचे ऑपरेशन्स करू शकलो. उदार मनाने ती मदत करायची. तोच भाव आणि संस्कार माझ्यावर आहे. याच प्रेरणेतून हा प्रकल्प उभा झाला. यासाठी अनेकांचे सहकार्य लाभले. या केंद्रात अत्यंत कमी पैशांत एमआरआय, सीटी स्कॅन, डिजिटल एक्स रे, डायलिसिसची सोय असणार आहे.
 
 
बोनमॅरो ट्रान्सप्लाण्टसाठी शासनाने करावी मदत
उत्तर नागपुरात 80 हजारांच्यावर सिकलसेल रुग्ण आहेत. या क्षेत्रातील डॉ. मिलिंद माने यांच्या योगदानाकडे गडकरी यांनी लक्ष वेधले. पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली परिसरात रुग्ण आहेत. हा आजार अत्यंत वेदनादायी आणि खर्चिक आहे. बोनमॅरो ट्रान्सप्लाण्टसाठी लाखो रुपये खर्च येतो. या सोईसाठी शासनाने मदत करावी. या आजाराचा महात्मा फुले योजनेत समावेश केल्यास अनेकांना उपचार घेता येईल आणि त्यांचा जीव वाचेल, याकडे गडकरी यांनी लक्ष वेधले.
 
 

तीन किमीच्या आत प्राथमिक आरोग्य सेवा
प्राथमिक आरोग्य सुविधा मजबूत झाल्यास शहरांमधील मोठ्या रुग्णालयांवरील ताण कमी होईल. तीन किमीच्या आत प्राथमिक आरोग्य सुविधेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. येणाऱ्या चार वर्षांत देशातील सर्वोत्तम आरोग्य व्यवस्था महाराष्ट्रात असेल. त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. एकही गरीब रुग्ण उपचारापासून वंचित राहू नये अशी व्यवस्था करू, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. यासोबतच सिकलसेल आणि थॅलेसेमिया आजारांसाठी लवकरच योजना तयार करीत असल्याचेही ते म्हणाले.
Powered By Sangraha 9.0