भारतीय अध्यात्म आणि विज्ञान

    दिनांक :28-Jul-2025
Total Views |
 
 
वेध
 
 
पुंडलिक आंबटकर
indian-spirituality स्वामी विवेकानंदांनी आधुनिक भारताची संकल्पना मांडून देशवासीयांमध्ये नवी चेतना जागविली. विवेकानंदांचे अध्यात्म विज्ञानाशी एकरूप झालेले होते. शिकागोच्या धर्मपरिषदेत त्यांनी हिंदू धर्माला ग्लानी आल्याचे कबूल करतानाच कणखर आणि आत्मनिर्भर भारताचे स्वप्न पेरले. आज स्वामी विवेकानंदांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आधुनिक भारतावर आणि प्रामुख्याने तरुणाईवर येऊन पडली आहे. या दिशेने भारत अग्रेसरसुद्धा झाला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वामी विवेकानंदांच्या विज्ञानवादाचा आयुष्यभर पुरस्कार केला. भारतीय अध्यात्म आणि विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ‘अध्यात्म म्हणजे ‘स्व’चा शोध तर विज्ञान म्हणजे सत्याचा शोध घेणे होय.’ आणि या दोन्ही बाबी एकमेकांना पूरक आहेत. भारतीयांच्या प्रत्येक परंपरा आणि चालीरीतींच्या मुळाशी विज्ञानच आहे आणि हे अनेकदा सिद्धसुद्धा झालेले आहे. अध्यात्माने सूक्ष्म जगाची कल्पना मांडली आहे. आणि या सूक्ष्म जगाचा शोध घेणे हाच विज्ञानाचा मूळ हेतू आहे. वेद, पुराणे आणि इतर धार्मिक ग्रंथांमध्येसुद्धा विज्ञानाची महती सांगितली आहे.
 
 

अध्यात्म  
 
रामदास स्वामी यांच्या दासबोधातातही याबाबत अनेक वचने आली आहेत. संत कबरि, संत तुकाराम यांच्या ईश्वरवादातही अध्यात्महसोबतच विज्ञानही दडलेले आहे. मात्र, आपण केवळ त्यांच्या ओव्यांचा वरवर विचार करतो. त्यातील सत्य उलगडण्याचा प्रयत्न पाहिजे त्या प्रमाणात होत नाही! हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्मासारख्या विविध भारतीय आध्यात्मिक परंपरांमध्ये आत्मज्ञान आणि मुक्तीसाठी वेगवेगळे मार्ग सांगितले आहेत. परंतु, या सर्वांचा मूळ उद्देश एकच आहे. अर्थातच भौतिक जगाची कवाडे भेदून मोक्ष प्राप्त करणे हेच अंतिम उद्दिष्ट अध्यात्माने मनुष्य जीवनाचे मानले आहे. प्राचीन भारताने खगोलशास्त्र, गणित, आयुर्वेद आणि धातुशास्त्र आदी क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात प्रगती साधली होती. परंतु, नंतर खुळचट समजुती चिकटल्या आणि मूळ हेतू बाजूला पडून देशाची कधीही भरून न निघणारी हानी झाली. परंतु, आता आधुनिक भारताने इतिहासातील चुकांमधून धडा घेतला आहे आणि अध्यात्माबरोबरच विज्ञानातही यशोशिखर गाठले आहे. विज्ञान बाह्य जगाचा अभ्यास करते तर अध्यात्म आंतरिक जगाचा, असाही एक समज आहे. याच आधारावर विनोबा भावे यांनी अध्यात्म आणि विज्ञानाची सांगड घालून ‘सर्वोदय‘ ही संकल्पना मांडली. या संकल्पनेचा मूळ उद्देश नैतिक मूल्यांवर आधारित समाजनिर्मिती हा होता. काही विचारवंत विज्ञानाला वस्तुनिष्ठ आणि अध्यात्माला व्यक्तिनिष्ठ मानतात. हे खरे असले तरी या दोन्हींचा मूळ उद्देश एकच आहे. अशाही परिस्थितीत अध्यात्म विज्ञानापेक्षा श्रेष्ठ ठरते कारण अध्यात्मात संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची कामना केली जाते. संत ज्ञानेश्वर माउलीने विधात्यापुढे जे पसायदान मागितले त्यात संपूर्ण विश्वाच्या कल्याणाची मागणी केलेली आहे. एकूणच अध्यात्म ही भारतीयांनी जगाला दिलेली सर्वांत मोठी देणगी होय. भौतिकवादी नागरिक नेहमी विज्ञानाला सर्वश्रेष्ठ मानतात. ज्या गोष्टी विज्ञानाच्या चौकटीत बसत नाही अशा गोष्टी मग या लोकांना चुकीच्या वाटू लागतात. जिथे मनुष्याची कल्पना शक्ती संपते तिथूनच खऱ्या अर्थाने भारतीय अध्यात्म सुरू होते. विज्ञान ही बाब प्राकृत आहे. तर अध्यात्म प्रकृतीच्याही पल्याड जाऊन प्राप्त होणारी अवस्था आहे! विज्ञानात ज्या बाबी बसत नाही आणि तरीही त्या घडल्या तर मग त्याला चमत्काराचे नाव दिले जाते. वास्तविक त्यामागेसुद्धा विज्ञानच असते. फक्त ते मनुष्याच्या आकलनापलीकडील असते आणि त्यामुळेच त्याला चमत्कार म्हटले जाते. या सर्व बाबींचे निराकरण अध्यात्माद्वारेच होऊ शकते. भारतीय अध्यात्माने सूक्ष्म देहाची संकल्पना मांडलेली आहे. मात्र, विज्ञानात ही बाब अद्याप सिद्ध झालेली नाही. किंबहुना मनुष्याने ती स्थिती अद्याप तरी प्राप्त केलेली नाही. परंतु, केवळ एवढ्याच सबबीवर सूक्ष्म देहाची कल्पना नाकारणे हा मूर्खपणा ठरेल. कारण, जगात कुठलीही बाब विनाकारण अस्तित्वात येत नाही. त्यामागे नक्कीच कोणती तरी शक्ती असते. डोळ्यांनी दिसते तेवढेच सत्य नसते. जे डोळ्यांनी दिसत नाही तेच अंतिम सत्य असते आणि नेमका याचाच शोध अध्यात्माद्वारे घेतला जातो. दिसते ते क्षणभंगुर असते आणि जे दिसत नाही तेच अविनाशी आणि सर्वशक्तिमान असते, ही बाब विज्ञानालाही मान्य आहे. आज मनुष्य भौतिकवादात अडकून पडलेला आहे.indian-spirituality परंतु, बऱ्याच पुढारलेल्या देशांमधील नागरिकांना भारताचा अध्यात्मवाद भुरळ घालत आहे. त्यामुळेच ते भारतात येऊन भारतीय परंपरा, चालीरीती आणि संस्कृतीचा अभ्यास करीत आहेत.
 
9881716027