अखेर मालदीवला झाली उपरती

28 Jul 2025 13:13:19
अग्रलेख 
 
Maldives मालदीवला अडीच हजार वर्षांचा समृद्ध इतिहास लाभला आहे. कधीकाळी बौद्ध आणि हिंदू धर्मीयांचे प्राबल्य असलेला इवलासा मालदीव आता मुस्लिमबहुल देश आहे. व्यापार आणि धर्मप्रसारासाठी जगभर आपली गलबते आणि मोठी जहाजे घेऊन फिरणारे अरब व्यापारी मालदीवमध्ये मुक्कामाला असत. हिंदी महासागरात वसलेल्या या बेटावर पाचव्या शतकापासून मानवाने वस्ती करायला प्रारंभ केला. श्रीलंका आणि दक्षिण भारतातील नागरिक मोठ्या संख्येने येथे येऊन वसले. श्रीलंकन नागरिकांची संख्या असल्याने बौद्ध धर्मीयांची संख्या बहुसंख्य होती. मालदीवमध्ये 1400 वर्षे बौद्ध नांदत होते. त्याच्यासोबत हिंदू असलेले तमिळही सुखात होते. पण, संयमी, मवाळ आणि सर्वांना सामावून घेणाऱ्या जमाती दिसल्या की प्रलोभने दाखवीत अथवा बलपूर्वक त्यांची संस्कृती नष्ट करण्याचा कुटिल खेळ अरबांनी सुरू केला होता.
 
 

मालदीव 
 
 
त्याला मालदीवमधील बौद्धही बळी पडले. आठव्या शतकात जे सिंधमध्ये घडले ते मालदीवमध्येही दिसून आले. बाराव्या शतकात मालदीवला पूर्णपणे इस्लाममध्ये परिवर्तित करण्यात आले. शेवटचा बौद्ध शासक धोवेमी यांनी 1153 मध्ये इस्लाम स्वीकारला आणि स्वतःला सुल्तान मोहम्मद अल-अदिल म्हणून घोषित केले. तेव्हापासून येथे सुल्तान राज्य करू लागले. या देशात विविध प्रकारचे शंख मोठ्या प्रमाणात आढळतात. बहुमूल्य शंखांचा उपयोग चलन म्हणूनही केला जात असे. पंधरा वर्षे पोर्तुगीजांनीही येथे राज्य करून पाहिले पण त्यांना लवकरच हाकलण्यात आले. जवळच असलेला सिलोन अर्थात श्रीलंका डचांच्या ताब्यात होता. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात श्रीलंका ब्रिटिशांच्या ताब्यात आल्यानंतर मालदीवही ब्रिटिशांचाच अंकित बनला. 1965 पर्यंत मालदीव ब्रिटिशांचा गुलाम होता. 26 जुलै 1965 रोजी मालदीव स्वतंत्र होऊन इब्राहिम नासीर सुल्तान झाले. पण सुखाने नांदतील ते सुल्तान कसले? मोहम्मद फरीद दीदी यांनी सत्ता हाती घेऊन स्वत:ला राजा म्हणून घोषित केले. तीन वर्षे गोंधळ माजल्यानंतर 1968 मध्ये दीदीची हकालपट्टी करण्यात आली आणि सोबतच मालदीवच्या जनतेने राजेशाहीला लाथ मारून नोव्हेंबर 1968 मध्ये प्रजासत्ताक मालदीव म्हणून घोषित केले. मौमून अब्दुल गयूम हे मालदीवचे सर्वाधिक लोकप्रिय अध्यक्ष होते. ते सहावेळा अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. गयूम यांच्याविरोधात नोव्हेंबर 1988 मध्ये मोठा उठाव झाला होता. तेव्हा भारताने सैन्याची मदत पाठवून उठाव मोडून काढला होता. मुस्लिम देशांमध्ये लष्करी उठाव, मार्शल लॉ लागू करणे, सत्तेसाठी सत्ताधारी अथवा विरोधकांच्या हत्या घडविणे सामान्य गोष्टी असतात. आपले शेजारी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश या देशांची उदाहरणे आपल्यासमोर आहेत. 2023 मध्ये झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पीपल्स नॅशनल काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद मुईझ्झू विजयी झाले. सत्तेवर येताच त्यांनी भारताविरोधात पावले उचलायला प्रारंभ केला. त्यांचा ओढा चीनकडे जास्त होता. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर मुईझ्झू प्रथम तुर्की आणि चीनच्या दौऱ्यावर गेले होते. एरवी निवडणुकीत विजयी झाल्यानंतर यापूर्वीच्या अध्यक्षांनी जवळचा सहकारी म्हणून भारताला भेट दिली होती. चीनच्या सहकार्याने मुईझ्झू यांनी भारताला कोंडीत पकडण्याचे प्रयत्न चालविले होते. निवडणुकीच्या काळातच प्रचारसभांमध्ये ‘इंडिया गो आऊट’चा नारा देत ते सत्तेवर आले होते.
भारतीयांचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि मालदीवमध्ये तैनात असलेले 80 भारतीय सैनिकांना परत बोलवावे यासाठी मुईझ्झू भारताला धमक्या देत होते.Maldives  खरे तर त्यांना दीर्घकालीन चालत आलेली परिस्थिती पूर्णपणे बदलवून चीनच्या जवळ जायचे होते. एक स्वतंत्र आणि सार्वभौम देश म्हणून कुणाशी मैत्री करायची हा त्यांचा प्रश्न होता. पण, मालदीव सरकारमधील तीन उपमंत्र्यांनी काहीही कारण नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली. मंत्र्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भारतीयांमध्ये संतापाची लाट उसळली. बॉयकॉट मालदीवचा ट्रेंड सोशल मीडियावर फिरू लागला. पंतप्रधान मोदी यांनी टीकेला प्रत्युत्तर न देता लक्षद्वीपच्या समुद्र किनाऱ्यावर जात भारतीयांनी या बेटाला भेट द्यावी, असे आवाहन आपल्या कृतीतून केले. भारतीयांना मोदींनी दिलेला संदेश कळला आणि मग काय पर्यटकांनी मालदीवऐवजी लक्षद्वीपकडे मोर्चा वळविला. आम्ही लहान असू पण तुम्हाला आमच्यावर दादागिरी करण्याचा परवाना मिळाला नसल्याचे वक्तव्य अध्यक्ष मुईझ्झू यांनी करीत आगीत तेल ओतले. मालदीवमधील पर्यटन व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली. भारतीय पर्यटकांनी पाठ फिरविल्याने समुद्र किनारे ओस पडू लागली. हॉटेल्सची बुकिंग धडाधड रद्द होऊ लागली. भारतीय सरकारने काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती पण जनतेच्या बहिष्कारामुळे आपण फार मोठी चूक केली हे मुईझ्झू यांच्या लक्षात आले. मोदींवर टीका करणाऱ्या तिन्ही उपमंत्र्यांची हकालपट्टी करण्यात आली. पण, बाण सुटला होता. मोईझ्झू नरमले असले तरी त्यांच्या मनातील भारतद्वेष सर्वांना दिसून आला. पुढे जे होईल ते केवळ व्यावहारिक पातळीवर होईल, त्यात पूर्वीसारखी आपुलकी, मित्रत्वाचे भाव नसतील याची जाणीव मोईझ्झू यांना भारताच्या प्रतिसादातून झाली. ज्या देशाने कधी कुणाची एक इंचही जमीन बळकावली नाही, जो शेजाऱ्याना सातत्याने सर्वप्रकारचे सहकार्य करतो त्या भारतासोबत चीन, तुर्की, पाकिस्तान या देशांच्या प्रभावात येऊन संबंधात वितुष्ट आणणे म्हणजे चालत्या गाडीच्या चाकातील खिळा काढण्यासारखे होते. मालदीवची अर्थव्यवस्था पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे आणि या इस्लामिक देशाला भेट देणारे आणि त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर टाकणारे सर्वाधिक पर्यटक हे भारतीय असतात. भारताला डिवचल्याचा परिणाम असा झाला की अवघ्या पंधरा-वीस दिवसांमध्येच मालदीवला 15 कोटी रुपयांचा फटका बसला. जेमतेम पाच लाख लोकसंख्या असलेल्या या देशासाठी 15 कोटी रुपये म्हणजे फार मोठी रक्कम आहे. मालदीवचे सरकार आणि जनतेची अक्कल थोड्याच दिवसांत ताळ्यावर आली. भारताने मदत करणे थांबविल्यास देश दिवाळखोरीत निघाल्याशिवाय राहणार नाही आणि अशा संकटसमयी ना तुर्की, पाकिस्तान मदतीला येईल ना चीन याची जाणीव मुईझ्झू यांना झाली. त्यांनी भारताशी संबंध सुधारण्यास प्राधान्य दिले. मोदी सरकारनेही मनाचा मोठेपणा दाखविला. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यावर मुईझ्झू शपथग्रहण समारंभाला दिल्लीला आले होते. ऑक्टोबर 2024 मध्ये अधिकृतपणे भारताच्या दौऱ्यावर आले होते. भारत हटावचा नारा देणारे मुईझ्झू यांचे धोरण आणि वागण्यातील व्यावहारिक बदल त्यांच्यासाठी अपरिहार्य असल्याची जाणीव भारतालाही आहेच. नेबरहूड फर्स्ट या धोरणाचा मालदीव हा भाग आहे.Maldives शेजारी आमच्यासाठी प्राधान्यस्थानी असल्याची भूमिका भारताने स्वीकारलेली आहे. 2024 मध्ये ‘इंडिया आऊट’ म्हणणारे मुईझ्झू यांनी ‘वेलकम इंडिया’ ही मोहीम सुरू केली आहे. जास्तीत जास्त भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट द्यावी हे या मोहिमेमागील उद्दिष्ट आहे. इंग्लंडसोबत ऐतिहासिक व्यापार करार झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी 26 जुलैला मालदीवच्या दोन दिवसीय दौऱ्यावर दाखल झाले. मालदीवचा विकास व्हावा आणि त्याच्या क्षमता वाढविण्यासाठी भारत नेहमीच सहकार्य करण्यास तयार असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले. मालदीवच्या स्वातंत्र्यदिनाचे प्रमुख पाहुणे म्हणजे मोदी यांची उपस्थिती होती. भारताकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मुईझ्झू यांची आशा पंतप्रधान मोदींनी पूर्ण केली. मालदीवला 4850 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा याप्रसंगी मोदींनी केली. केवळ आपले शेजारीच नव्हे तर जगातील प्रत्येक देशासोबत मैत्रीचे संबंध ठेवण्याला भारत प्राधान्य देतो. दुर्दैवाने भारतासारख्या विशाल हृदय असलेल्या देशासोबत मैत्रीऐवजी फटकून आणि शत्रुत्वाने वागणारे पाकिस्तान, चीन, बांगलादेश, नेपाळसारख्या देशांचा शेजार आपल्याला लाभला आहे.Maldives मालदीवने कुरापती काढूनही त्याला मोठ्या मनाने सहकार्य करण्याचे आणि शेजारी देश म्हणून बरोबरीने वागविण्याचे औदार्य भारताने दाखविले आहे.
Powered By Sangraha 9.0