रेमोना परेराचा जागतिक विक्रम

१७० तास सलग भरतनाट्यम सादर

    दिनांक :28-Jul-2025
Total Views |
कर्नाटक,
Remona Pereira कर्नाटकातील मंगळूर येथील रेमोना परेरा या विद्यार्थिनीने १७० तास सतत भरतनाट्यम सादर करत जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. मंगळूरच्या सेंट अलॉयसियस कॉलेजमध्ये बी.ए. अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या रेमोनाने तिच्या या अद्वितीय कामगिरीने गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.ही कामगिरी तिने कॉलेजच्या रॉबर्ट सिक्वेरा हॉलमध्ये सात दिवस रात्रंदिवस भरतनाट्यम सादर करून साध्य केली. या आधीचा विक्रम सलग १२७ तासांचा होता. मात्र रेमोनाने १७० तासांचा भरतनाट्यम सादर करून हा विक्रम मोडीत काढत जागतिक स्तरावर आपली छाप सोडली आहे.
 

Remona Pereira  
रेमोना मागील १३ वर्षांपासून भरतनाट्यमचा सराव करत असून, तिने यापूर्वीही अनेक विक्रमांची नोंद केली आहे. अभ्यासासोबतच नृत्यालाही तितकेच महत्त्व देणाऱ्या रेमोना दररोज ५ ते ६ तास भरतनाट्यमचा नियमित सराव करत असते.
ही संपूर्ण Remona Pereira  सादरीकरण प्रक्रिया गोल्डन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली. सात दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे संपूर्ण चित्रीकरण करण्यात आले. रेकॉर्ड अधिकाऱ्यांनी स्वतः सादरीकरण पाहिले आणि त्याची अधिकृत नोंद केली. या विक्रमी सादरीकरणात कॉलेज प्रशासन, शिक्षकवर्ग आणि वर्गमित्रांनी रेमोनाला पूर्ण पाठिंबा दिला.सलग नृत्यादरम्यान रेमोना दर तीन तासांनी १५ मिनिटांचा विश्रांती ब्रेक घेत होती. या काळात तिने केळी, दही, नारळपाणी आणि चांगले शिजवलेले पांढरे भात असा हलका आहार घेतला. तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि रुग्णवाहिका या सर्वांची एक टीम सातत्याने उपस्थित होती. प्रत्येक विश्रांतीवेळी डॉक्टर तिची तपासणी करत होते.या सात दिवसांच्या कालावधीत रेमोनाने भरतनाट्यमच्या विविध शैली आणि प्रकार सादर केले. तिच्या या अपूर्व कामगिरीबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन होत आहे.