financial-prosperity ‘‘यावत जीवेत सुखम जीवेत, ऋणम् कृत्वा घृतं पिबेत
भस्मिभूतस्य शरीरस्य, पुनरागमनं कुत:’’ असे विचार नास्तिकवादी ऋषी चार्वाक यांनी व्यक्त केलेले होते. परंतु भारतीय माणसाने या विचारांवर कधीही श्रद्धा ठेवली नाही. आम्हाला कोणाचा एक रुपया जास्तीचा नको आणि कोणाची आमच्यावर उधारी सुद्धा राहायला नको असे म्हणणारे लोक होते. मी कोणाची उधारी घेऊन मरणार नाही अशा पद्धतीचा बाणा अनेक लोकांचा होता. परंतु भारतीय रिझर्व्ह बँकेने सादर केलेल्या आकडेवारीवरून असे लक्षात येत आहे की भारतीयांचे बचतीचे प्रमाण घटलेले आहे. भारतीय माणसाचा ओढा हा कर्ज घेऊन जीवनाला आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्यामागे तसेच चैनीच्या वस्तू खरेदी करण्यामागे दिसून येत आहे.
पूर्वी लोक त्याच गोष्टी खरेदी करायचे ज्यांची त्यांना आवश्यकता होती, परंतु आता शेजाऱ्याने घेतले आहे, नातेवाईकांनी घेतले आहे म्हणून मी पण घेतले पाहिजे अशा पद्धतीची विचारसरणी अनेकांची दिसून येते. त्यामुळे अनेक गोष्टींचा संग्रह वाढलेला आहे. त्यांची पूर्तता करण्यासाठी कर्ज घ्यावे लागत आहे. कर्ज घ्यायचे नसेल तर क्रेडिट कार्ड हा सुद्धा एक पर्याय लोकांजवळ उपलब्ध आहे. त्यामुळे क्रेडिट कार्डवर वस्तू खरेदी करणे आणि त्याचे पैसे भरत राहणे असे सुद्धा प्रकार सर्वत्र दिसून येतात. यावरून ‘उद्या कोणी पाहिलेला आहे’ अशा पद्धतीची भावना सुद्धा लोकांची दिसून येते. ज्यांच्या घरची कार महिन्यातून एकदाच बाहेर निघते त्यांनी पण सामाजिक संकेत म्हणून ती विकत घेतली आहे. घरातील अनेक वस्तू अशा आहेत की ज्यांचा कुठलाही नियमित वापर नसताना सुद्धा आज त्या संग्रही आहेत. त्याकरिता पैसे खर्च केले गेलेले आहेत. कपड्यांचेही तसेच आहे. अनेक कपडे अनेक दिवसपर्यंत वापरले जात नाहीत, परंतु घेतले मात्र जातात. चप्पल आणि बुटांचेही तसेच आहे. अनेकांना नवीन घेतल्यावर चार दिवस वापरली आणि त्यानंतर वापरण्याचा योग आला नाही असे पण दिसून येते.
आज लोक कर्जाचे हप्ते भरण्यासाठी जगत आहेत का असाही प्रश्न निर्माण होतो. माझे एक मित्र मला म्हणाले की, मला आता तब्येत चांगली ठेवावी लागेल. मी म्हणालो का बरं? तर ते म्हणाले, आता दोन कोटींचे कर्ज घेतलेले आहे. त्यामुळे ते फेडण्यासाठी आणखी काही वर्ष काम करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ‘‘शरीरमाद्यम् खलू धर्म साधनम्’’ ही भावना नाही तर ‘‘कर्ज साधनम्’’ ही भावना आहे. आरोग्य हा माझा मूलभूत अधिकार आहे. यासाठी मी प्रयत्न करीन ही भावना नाही तर कर्जाचे हप्ते फेडायचे आहेत त्यासाठी मला उत्तम स्वास्थ्य ठेवणे आवश्यक आहे ही भावना झालेली आहे. महागाई वाढली आहे.भविष्यकाळात ती आणखी वाढणारच आहे. परंतु आमच्या गरजा याही जर वाढत राहिल्या तर आम्हाला काळानुसार, फॅशननुसार वेगवेगळ्या गोष्टींचा संग्रह करीत जावा लागणार आहे. त्यामुळे ज्या पैशांची कधीकाळी बचत व्हायची तो पैसा आता कोणीतरी आमच्याकडून हिरावून घेणार आहे हे सुद्धा सत्य आहे.
अनेक वेळा सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये मंदी येते. ज्यांचे भले मोठे पगार आहेत असे लोक नोकरीवरून काढले जातात. त्यापैकी अनेक नैराश्यामध्येही जातात. त्यावेळेस सर्वसामान्य माणसाला असा प्रश्न पडतो की या माणसाला इतका मोठा पगार होता व इतके वर्ष झाले हा नोकरी करत आहे मग याला निराशेच्या गर्तेत जाण्याचे कारण काय आहे. तर ते कारण असे आहे की याने आपल्या पगाराला पाहून मोठी कर्ज घेतलेली असतात. मोठे घर घेतलेले असते, मोठी कार घेतलेली असते. असे अनेक मोठे खर्च केलेले असतात व हे सर्व कर्जावर केलेले असतात. त्यामुळे नोकरी गेली तरी आहे त्या पैशांमध्ये आम्ही दोन-चार वर्ष आरामात जगू शकतो, या भावनेपेक्षा घेतलेल्या अमाप कर्जामुळे कर्जाचे हप्ते कसे फेडले जातील या चिंतेने ते नैराश्यात जातात असे लक्षात आलेले आहे. अंथरूण पाहून पाय पसरण्याचे दिवस आता संपलेले आहेत. पसरलेल्या पायांना झाकण्यासाठी अंथरुणाचा शोध सुरू असतो.
आपल्या प्राचीन धर्मशास्त्रांमध्ये पैशाला अतिशय महत्त्वाचे मानलेले आहे. परंतु पैसा खर्च करताना तो रसायनासारखा खर्च करावा असे म्हटलेले आहे. म्हणजे साखरेचा चमचा मोठा, त्याच्यापेक्षा लहान चहाचा. परंतु सुवर्ण भस्म जर औषधामध्ये टाकायचे असेल तर त्यासाठी लागणारा चमचा हा तर खूपच लहान राहील. तशा पद्धतीचा चमचा हा औषधशाळेत रसायनांसाठी वापरण्यात येतो. त्यामुळे पैसे खर्च करताना व्यक्तीने रसायनांच्या चमच्याने खर्च करावे म्हणजे अगदी थोडे थोडे खर्च करावे असे सांगितलेले आहे. परंतु आज चंगळवाद वाढलेला आहे. चैनीची प्रवृत्ती वाढलेली आहे. दिवसभरात जर मला कंटाळा येत असेल तर मग मी काय केले पाहिजे तर चला खरेदीला जाऊ, काहीतरी खरेदी केले पाहिजे, त्याच्यामध्ये वेळ घालवला पाहिजे अशा पद्धतीची प्रवृत्ती आहे. यामुळे देशातील बचतीचे प्रमाण कमी होत आहे. कमी झालेल्या बचतीचा परिणाम हा आरोग्य, मुलांचे शिक्षण, लग्न, निवृत्ती इत्यादींकरिता जो पैसा साठवला जायचा त्या बचतीवर झालेला आहे. त्यामुळे आज जरी चार दिवस सुखाचे वाटले तरी पण भविष्यकाळात समस्या उद्भवू शकतात हे लक्षात घेतले गेले पाहिजे. आपल्या देशामध्ये महिला या फार पुरातन काळापासूनच बचत करीत असायच्या. उद्योगधंदा, नोकरी यामध्ये कुठलेही संकटाचे प्रसंग आले तर त्यावेळेस महिला स्वत:जवळच्या बचतीतून त्या आपल्या संसाराला मदत करायच्या. छत्रपती शिवाजी महाराज आग्राला कैदेत असताना जिजामाता यांनी त्यांच्या खर्चाच्या पैशातून वाचविलेल्या पैशातूनच स्वराज्याचे काम चालविले होते याचे स्मरण आपण ठेवले पाहिजे.
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये भारताने ज्यावेळेला पोखरण येथे अणू विस्फोट केला त्यावेळेस अमेरिकेतसह काही देशांनी आपल्यावर आर्थिक निर्बंध टाकले. तरीही त्यावेळेस भारत डगमगला नाही. कारण करोडो भारतीयांची अल्पबचत त्यावेळेस सरकारला मदत करणारी ठरली. आज सरकार पायाभूत सुविधांसाठी विदेशाकडून कर्ज घेत असते तर सर्वसामान्य माणूस हा चैनीच्या वस्तू, प्रवास आणि इतर गोष्टींसाठी कर्ज घेत असतो. देशाची अल्पबचत ही सरकारसाठी मोठी आशादायक व पाठिंबा देणारी असते. तुमचा पगार किंवा उत्पन्न कितीही कमी असले तरीही बचतीची सवय तुम्हाला आहे किंवा नाही हे महत्त्वाचे आहे. तुम्ही थोडे थोडे जरी पैसे जमा केले तरी भविष्यकाळात त्यातून एक मोठा निधी निर्माण होईल की जो तुमच्या भविष्यकालीन गरजांसाठी एवढेच नव्हे तर तुमच्या मुलांसाठी सुद्धा कामात येऊ शकेल. घरोघरी केली जाणारी अल्पबचत ही जसा कुटुंबाचा आधार आहे तसाच तो राष्ट्राचाही आधार आहे. त्यामुळे बचत हे राष्ट्रकार्यच आहे असे आपण समजले पाहिजे. बचत ही एक चांगली सवय आहे. खर्च केल्यानंतर उरलेले पैसे वाचविणे हे योग्य नाही तर भविष्यासाठी आवश्यक तेवढे पैसे दरमहा जमा करणे व उरलेल्या पैशातून खर्च करणे ही योग्य पद्धत आहे. या बचतीतूनच प्रत्येक पिढी भावी पिढीला काहीतरी त्यांच्या भविष्यासाठी भेट देऊन जात असते. आम्ही आमच्या खर्चाच्या सीमा, मर्यादा आखल्या पाहिजेत व आपला भविष्यकाळ आर्थिकदृष्ट्या सक्षम केला पाहिजे.
अमोल पुसदकर