क्रांतीदिनी नागपूरात विदर्भराज्य आंदोलन समितीचे आंदोलन

28 Jul 2025 17:59:54
गोंदिया,
vidarbha-state-movement-committees शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी, विदर्भाच्या सर्वांगिण विकासासाठी, नक्षलवादाचे समूळ उच्चाटनासाठी, बेरोजगारांच्या रोजगारासाठी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती एकच उपाय आहे. विदर्भ राज्यासाठीचा लढा तीव्र करणे आहे, यासाठी येत्या 9 ऑगस्टला दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत नागपूरातील संविधान चौकात निदर्शने आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनात गोंदिया जिल्ह्यातील जनतेने बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीचे अध्यक्ष तथा माजी आ. अ‍ॅड. वामनराव चटप यांनी केले. ते शहरात 28 जुलै रोजी आयोजित पत्र परिषदेत बोलत होते.
 
 

विदर्भ  
 
 
पुढे चटप यांनी सांगीतले, घटनेतील कलम 3 प्रमाणे विदर्भाचे स्वतंत्र राज्य तत्काळ निर्माण करणे आवश्यक आहे. राज्याचे महसुली उत्पन्न 5 लाख 60 हजार 963 कोटी आहे, तर राज्यावर 7 लाख 82 हजार कोटी कर्ज आहे. या कर्जावर 56 हजार 727 हजार कोटी व्याज द्यावे लागणार आहे. सरकारने अर्थ संकल्पानंतर 13 हजार कोटींचे कर्ज घेतले. तर केंद्राकडे 1 लाख 32 हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्याची परवानगी मागितली आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत राज्य सरकारवरील कर्ज व व्याज 9 लाख 83 हजार 787 कोटी रुपये होणार असल्याचे चटप म्हणाले. विदर्भाचा 60 हजार कोटींचा सिंचनाचा अनुशेष व सार्वजनिक आरोग्य, शिक्षण, उद्योग, ऊर्जा, रस्ते ग्रामविकास, आदिवासी विकास व सामाजिक न्याय विभागाचा 15 हजार कोटी रुपयाचा अनुशेष असा 75 हजार कोटी रुपयाचा निधी देऊन विदर्भाचा अनुशेष भरून काढण्यात महाराष्ट्र सरकार असमर्थ आहे. अर्थातच राज्याची वाटचाल दिवाळखोरीकडे असल्याचे चटप म्हणाले. विदर्भातील शेतकर्‍यांच्या आत्महत्या, दरडोई उत्पन्नात घट, कुपोषण, माता व बालमृत्यूही कमी होऊ शकले नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. रोजगारांच्या संधी नसल्यामुळे येथील तरुण वाममार्गाला लागत आहेत, बेरोजगारांचे स्थलांतर मोठ्या प्रमाणात वाढले आहे.vidarbha-state-movement-committees यावर उपाय केवळ स्वतंत्र विदर्भ राज्य आहे. यासाठी 9 ऑगस्ट रोजी आंदोलनाची हाक देण्यात आली असून जनतेने आंदोलात सहभागी होण्याचे आवाहन चटप यांनी यावेळी केले. पत्रपरिषदेला मुकेश मासुरकर, तात्यासाहेब मते, संजय केवट, अतुल सतदेवे, छैलबिहारी अग्रवाल, वसंतराव गवळी, भूपेंद्र पटले, अरुण बन्नाटे, रमेश बिसेन, यशवंत वैद्य, एस. टी. शेंडे, वंदना तुरकर, कुंदा चंद्रिकापूरे, विजया ओझा, राखी भारद्वाज, जया कुमार, सोनू पारधी, पंचशीला पानतावणे आदी समितीचे पदादाधिकारी व वैदर्भिय नेते उपस्थित होते.

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी गावागावांत पोहचविण्यासाठी व पूर्व विदर्भात आंदोलनाची धग तेवत ठेवण्यासाठी पूर्व विदर्भाचा विदर्भ निर्माण मेळावा येत्या 17 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते संध्याकाळी 4 या वेळेत शहरातील यूनाइटेड हॉस्पिटल समोरील यशोदा सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्याला श्रीनिवास खांदेवाले, प्रकाश पोहरे, मुकेश मातुरकर, डॉ. पी. आर. राजपूत, अहमद कादर, निरज खांदेवाले, वामनराव चटप, राजेश काकडे आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. जनतेने मेळाव्यात सहभागी हाण्याचे आवाहन विदर्भ राज्य आंदोलन समितीने केले आहे.
Powered By Sangraha 9.0