विद्यार्थी आघाडी भारतीय जनता युवा मोर्चाने विद्यापीठात पुकारला आंदोलन

29 Jul 2025 20:03:20
नागपूर, 
rtmnu-news : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात मंगळवार दिनांक २९ जुलै रोजी विद्यापीठातील जमनालाल बजाज प्रशासकीय इमारत येथे विद्यार्थी आघाडी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे आंदोलन पुकारण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी विद्यापीठातर्फे 'कॅरी ऑन' सुरु करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विद्यापिठाच्या चुकीमुळे काही विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये कपात करून त्यांना अनुत्तीर्ण करण्यात आले असल्याचे आरोप यावेळी विद्यार्थी आघाडी भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांचे पेपर योग्य रित्या तपासण्यात आले नसून त्याची रिचेकिंग करण्यात यावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे.
 
 

rtmnu 
 
 
- विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी 'कॅरी ऑन'च्या विरोधात निर्णय
 
 
विद्यापीठाचे प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावार यांनी यासंबंधित आपली प्रतिक्रिया देताना सांगितले की, नियमांनुसार, जर विद्यार्थ्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात ५०% विषय उत्तीर्ण केले असतील तरच त्यांना एटीकेटी अंतर्गत तिसऱ्या सत्रात प्रवेश मिळतो. जर विद्यार्थ्यांनी चांगला अभ्यास केला आणि पहिले आणि दुसरे सत्र पूर्णपणे उत्तीर्ण झाले तर त्यांना कॅरी-ऑनची आवश्यकता राहणार नाही. त्यांना तिसऱ्या वर्षात आपोआप प्रवेश मिळेल. डॉ. कोंडावार म्हणाले की, १९७८ पासून विद्यार्थ्यांना एटीकेटी दिली जात आहे. गेल्या वर्षी सरकारच्या आदेशानुसार विद्यार्थ्यांना कॅरी-ऑन देण्यात येत होते, परंतु जर पहिले आणि दुसरे सत्र उत्तीर्ण न झालेल्या विद्यार्थ्यांना अजूनही पदोन्नती मिळाली तर त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत राहणार नाही. विद्यार्थ्यांच्या भावी भविष्यासाठी त्यांचा शैक्षणिक पाया मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच विद्यापीठाची शैक्षणिक गुणवत्ता राखण्यासाठी रातुम नागपूर विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने 'कॅरी ऑन'च्या विरोधात निर्णय घेण्यात आले होते.
 
- 'कॅरीऑन'बाबत विद्वत परिषदेची २ ऑगस्टला बैठक
 
 
रातुम नागपूर विद्यापीठात 'कॅरी ऑन' बाबत चर्चा करण्यासाठी शनिवार, दिनांक २ ऑगस्ट रोजी विद्वत परिषदेची तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. विद्यापीठ परिक्षेत्र अंतर्गत विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी कॅरीऑन लागू करण्याबाबत मागणी केली आहे. या सोबतच विविध विद्यार्थी संघटनांचे निवेदने देखील प्रभारी कुलगुरू डॉ. माधवी खोडे चवरे यांना प्राप्त झाली आहेत. विद्यार्थी संघटना तसेच विद्यार्थ्यांकडून प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने कॅरीऑन बाबत निर्णय घेण्याकरिता विद्वत परिषदेची तातडीची बैठक बोलावण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांनी दिली आहे.
Powered By Sangraha 9.0