हिंगणघाटात चाकूचा धाक दाखवून दरोड्याचा प्रयत्न

महिलेच्या धाडसाचेे कौतुक

    दिनांक :29-Jul-2025
Total Views |
हिंगणघाट,
Hinganghat येथील यशवंतनगर परिसरात सायंकाळी साधारणतः ७.२० वाजता दोन अज्ञात युवकांनी तन्ना कुटुंबाच्या घरी जबरदस्तीने प्रवेश केला. त्यावेळी घरात एक महिला एकटीच होती आणि ती घराच्या आतल्या खोलीत पूजेमध्ये व्यस्त होती. चेहर्‍यावर कापड बांधलेल्या दोन्ही आरोपींनी थेट घरात प्रवेश करत महिलेला चाकू दाखवत रोख रक्कम व सोन्याचे दागिने कुठे आहेत, अशी विचारणा केली. अचानक घडलेल्या प्रसंगामुळे महिला काही क्षण थक्क झाली, मात्र घाबरण्याऐवजी तिने संयम ठेवत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला.
 
 
Hinganghat
 
युवकांनी महिलेला पकडण्याचा प्रयत्न करताच त्यातील एका आरोपीने तिच्या तोंडावर हात ठेवून गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने हिमत दाखवून त्याचा अंगठा चावून चाकूचा मार रोखण्याचा प्रयत्न केला. Hinganghat या झटापटीत महिलेला हातावर जखमा झाल्या, पण तिचा प्रतिकार इतका जबरदस्त होता की घाबरलेल्या चोरट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले. या घटनेची माहिती मिळताच हिंगणघाट पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून फॉरेन्सिक पथक व श्वान पथक घटनास्थळी पोहोचले.
 
 
डीबी पथक, स्थानिक गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध पथकांकडून शहरात नाकाबंदी करून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. बातमी लिहेपर्यंत आरोपी फरार होते आणि त्यांचा शोध सुरू आहे. या घटनेमुळे यशवंतनगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून घरामध्ये एकट्याने राहणार्‍या नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे. Hinganghat शहरात वाढत्या चोरी, घरफोडी आणि इतर गुन्हेगारी घटनांबरोबरच ड्रग्ज आणि इतर अवैध धंद्यांनी थैमान घातले आहे. या दुहेरी संकटाने नागरिक भयभीत झाले असून कायदा आणि सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यू यशवंत नगर येथील आरती तन्ना यांच्या घरी ऐन सायंकाळी झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाने शहरातील सुरक्षिततेची स्थिती किती गंभीर आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे.