मुंबई,
ED raids in Mumbai, Nashik and Vasai राज्यातील मोठ्या शहरे असलेल्या मुंबई, नाशिक आणि वसई-विरारमध्ये आज सकाळपासून सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) एकाच वेळी १२ ठिकाणी धडक कारवाई केली. वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या डंपिंग ग्राउंडवरील ४१ अनधिकृत इमारतींसंबंधित आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणी ही छापेमारी करण्यात आली. या कारवाईमुळे प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, वसई-विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या वसईतील दीनदयाल नगर येथील निवासस्थानी सकाळी साडेसातच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. हे छापे त्यांच्या सेवानिवृत्तीच्याकाही तासांतच टाकण्यात आले, कारण कालच त्यांनी आपला पदभार मनोज कुमार सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द केला होता.

ईडीच्या प्राथमिक तपासात असे आढळले आहे की, वसई, विरार आणि नालासोपारा पूर्वेकडील डंपिंग ग्राउंडवर तब्बल ४१ अनधिकृत इमारती उभारण्यात आल्या. या इमारती बांधताना मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात असून, त्यात प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणी याआधीही ईडीने वसई-विरार शहरातील काही नामवंत बिल्डर, आर्किटेक्ट आणि तत्कालीन अधिकारी वाय. एस. रेड्डी यांच्यावर कारवाई करत १३ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी तब्बल ९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता.
सध्या अनिल कुमार पवार यांच्या घरात व कार्यालयात कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे. ईडीकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाल्याचा संशय बळावला असून, ED raids in Mumbai, Nashik and Vasai या प्रकरणात आणखी कोणकोणाच्या नावांचा उलगडा होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या छापेमारीमुळे वसई-विरार महापालिकेतील अनधिकृत बांधकामांचे प्रकरण पुन्हा एकदा ऐरणीवर आले असून, शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.