मी आर्यपुत्र’ पुस्तक घडविते भारतबोध

-रवी देशपांडे यांचे भाष्य -‘मै आर्यपुत्र हूं’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन

    दिनांक :29-Jul-2025
Total Views |
नागपूर, 
ravi-deshpande : पाश्चात्त्यांच्या खास करून इंग्रजांच्या आरशातून कित्येक दशके भारतीय चेहरा बघत आहेत. पण ‘मी आर्यपुत्र’ हे पुस्तक आपल्याला मुळांचा शोध करून देत भारतबोध घडविते. एकप्रकारे ही भारतीयांची भारतीय संस्कृतीशी होणारी पुनर्भेट असल्याचे भाष्य रवी देशपांडे यांनी केले.
 
 
 
27july1780
 
 
 
हिंदीतील ख्यातनाम लेखक मनोेज सिंह यांच्याद्वारे लिखित ‘मैं आर्यपुत्र हूं!’ या हिंदी कादंबरीचा मराठी अनुवाद प्रसिद्ध लेखिका डॉ. भारती सुदामे यांनी आर्यपुत्र!’ या नावाने केला आहे. त्याचे प्रकाशन रविवारी करण्यात आले. भारतीय संस्कृतीचे सातत्य हजारो वर्षांपासून टिकून आहे. संस्कृतीच्या मुळांचे पोषण कशाच्या आधारावर झाले हे जाणून घेण्यासाठी हे पुस्तक महत्त्वाचे आहे. वेदांमधील पुरावे, भाषाशास्त्र आणि अनुवंशशास्त्राच्या आधारावर केलेली मांडणी आर्य भारतीय असल्याचा उलगडा हे पुस्तक करीत असल्याचे देशपांडे यावेळी म्हणाले.
 
 
लेखक आणि निवृत्त पोलिस अधिकारी डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी निवृत्त न्या. विकास सिरपूरकर, लेखिका आशा पांडे, मूळ हिंदी कादंबरीचे लेखक मनोज सिंह, लाखे प्रकाशनचे चंद्रकांत लाखे व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम डॉ. भारती सुदामे यांनी अनुवादाविषयी मनोगत व्यक्त केले. आशीर्वचनात आशा पांडे यांनी पुस्तकाच्या रूपाने खरा इतिहास संशोधनात्मक पद्धतीने मांडल्या गेल्याची भावना व्यक्त केली. आशीर्वचनात विकास सिरपूरकर म्हणाले, या पुस्तकरूपी शोधनिबंधातून आर्यांबद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत होणार आहे. पुस्तकाचे सुरेख भाषांतर मराठी-हिंदीचा सेतू आणखी बळकट करणार आहे.
 
 
अध्यक्षीय भाषणात डॉ. भूषणकुमार उपाध्याय म्हणाले, भारतीय वैदिक संस्कृती विविधतेचा पुरस्कार करते. वेदांची निर्मिती, दर्शनशास्त्र, त्यात असलेला सहभाग यामुळे आपण किती प्रगल्भ होतो याची प्रचीती येते. पण पाश्चात्त्यांनी कारस्थान करून भारतीय संस्कृतीचे श्रेष्ठत्व नाकारले. चुकीचे नॅरेटिव्ह पसरविले. हे पुस्तक त्याचा समाचार घेत असल्याचे उपाध्याय यावेळी म्हणाले. याप्रसंगी पद्मश्री डॉ. विलास डांगरे, डॉ. लीना रस्तोगी, डॉ. चंद्रशेखर गुप्त, डॉ. पंकज चांदे, शुभांगी भडभडे, स्वाती सुरंगळीकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
 
मराठी मला माझ्या आईसारखी : मनोज सिंह
 
 
मनोगतात लेखक मनोज सिंह यांनी नागपूरशी जुळलेल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, १९५२ पासून वडील येथे वास्तव्यास असल्याने माझा नागपूरशी फार जुना संबंध आहे. त्यामुळे या नागपूर भेटीत सीताबर्डीला मी आवर्जून भेट दिली. गणेश टेकडीला माथा टेकविताना जणू आईच्या डोके टेकविल्याचे समाधान मला मिळाले. त्यामुळेच पुस्तकाचा मराठी अनुवाद झाल्याचा विशेष आनंद असल्याचेही ते म्हणाले.