नागपूर,
ganeshpeth-bus-stand : एसटी महामंडळातर्फे राज्यातील बसस्थानकावर हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात मंगळवारी ’अ’ वर्गात येणार्या नागपूर विभागातील गणेशपेठ बसस्थानकाचे सर्वेक्षण करून दुसरे मुल्यांकन करण्यात आले.

प्रादेशिक व्यवस्थापक नियंत्रण समिती-१ मध्ये प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के, प्रादेशिक अभियंता अशोक पन्हाळकर, प्रवासी ग्राहक मंचचे नितीन मुक्केवार, विजय पिंजरकर यांच्या चार सदस्यीय समितीने गणेशपेठ स्थानकाची पाहणी केली. यात बसस्थानक, स्वच्छता, पुरुष व महिलांच्या स्वच्छतागृह स्वच्छता, स्थानकाची रंगरंगोटी, बसस्थानकाचे नाव व फलाटावरील फेरी निहाय गावाचे फलक यांचे निरीक्षण करण्यात आले. यासह चौकशी खिडकी, वेळापत्रक, उद्घोषणा यंत्रणा, प्रवाशांच्या तक्रारी व सुचना संबंधित बसस्थानक, आगार आगार व्यवस्थापकाचा भ्रमणध्वनी क्रमांक, चालक व वाहकांचे विश्रांतीगृह, पार्किंग व अन्य व्यवस्थेचे सर्वेक्षण करण्यात आले. प्रादेशिक समितीतर्फे तीन महिन्यानंतर तिसरे मुल्यांकन होणार आहे. याप्रसंगी नागपूर प्रादेशिक व्यवस्थापक श्रीकांत गभणे यांच्यासह नागपूर विभागातील अनेक अधिकारी उपस्थित होते.