साटोडा ग्रापंच्या सरपंचपदी गौरव गावंडे

    दिनांक :29-Jul-2025
Total Views |
वर्धा, 
gaurav-gawande : साटोडा ग्रामपंचायतीत सरपंच बदलाचे वारे थांबता थांबेना. या ग्रामपंचायतीत दोन-तीन वर्षांत तीन सरपंच बदलले. अशातच विद्यमान सरपंच हरीश विरूटकर यांच्यावर अविश्वास प्रस्ताव आणून २८ रोजी गौरव गावंडे यांची सरपंचपदी निवड करण्यात आली आहे.
 
 
 
jklj
 
 
 
साटोडा ग्रामपंचायत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने प्रकाशझोतात असते. या ग्रामपंचायतमध्ये पाच वर्षात तीन सरपंच बदलले. दोन वर्षांपूर्वी सरपंच अजय जानवे यांच्यावर अविश्वास प्रस्ताव पारित झाला. त्यानंतर सरपंचपदी त्यांच्याच सहकार्याने हरीश विरूटकर यांना सरपंचपदी निवडून आणण्यात आले. परंतु, सन्मान न दिल्यामुळे तसेच ग्रामपंचायतचा कारभार हा विश्वासात घेऊन न चालल्यामुळे सर्व १३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव ९ जून रोजी पारित केला होता. दरम्यान, २८ रोजी माजी सरपंच तथा ग्रापं सदस्य अजय जानवे यांनी सहकार्य करून ग्रामपंचायत साटोडा वार्ड २ मधील सदस्य गौरव गावंडे यांना सरपंचपदी विराजमान करण्यात आले.
 
 
सोमवारी झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत एकच नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक अविरोध झाली. सरपंचपदी गौरव गावंडे यांची निवड झाल्याचे अध्यासी अधिकारी तथा नायब तहसीलदार संदीप दाबेराव यांनी घोषित केले. त्यानंतर सहकारी व मित्रमंडळींनी जल्लोष केला. या निवडणुकीत माजी सरपंच तथा ग्रापं सदस्य अजय जानवे, ग्रापं सदस्य नरेश होणाडे, प्रवीण नागोसे, अनंता राऊत, उमेश राऊत, स्वाती वाघमारे, प्रतिभा अनकर, सुनीता झाडे, कविता लांजेवार, पारबता रहांगडाले, विद्या किन्हेकर, नीता ठाकरे यांनी सहभाग घेतला.