तभा वृत्तसेवा
राळेगाव,
terror-of-thieves-ralegaon : महिनाभरापासून राळेगाव शहर व परिसरातील गावांमध्ये चोèयांचे सत्र सुरू असून, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिक रात्रभर जागून घरांचे संरक्षण करत असून अनेकांनी गल्लोगल्ली गस्त सुरू केली आहे. तालुक्यातील वाटखेड येथे काही दिवसांपूर्वी घरफोडी झाली होती. त्यानंतर राळेगाव शहरासह आसपासच्या गावांमध्ये चोरांची दहशत चांगलीच वाढली आहे. चोरटे दिवसा रेकी करत असल्याची शंका असून रात्री घरफोडी करत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे.
काही नागरिकांच्या म्हणण्यानुसार, चोरट्यांकडे लोखंडी गजासारखी हत्यारे असतात. तसेच ते घरातील स्त्री-पुरुषांना स्प्रे मारून बेशुद्ध करून चोरी करत असल्याची भीती नागरिकांमध्ये आहे. रविवार, 27 जुलै रोजी रात्री माळीपुरा परिसरात तीन ते चार घरांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्याचे सांगण्यात येत आहे. काही घरांमध्ये चोर दुसèयांदा आल्याचेही निदर्शनास आले आहे. वलीनगर परिसरातही चोरट्यांच्या हालचाली झाल्याचे बोलले जात आहे.
या सर्व घटनांमुळे राळेगाव शहर व परिसरातील नागरिक भयभीत असून अफवांचे पेव फुटले आहे. चोरीसंदर्भात नागरिकांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करणे आवश्यक आहे. वाटखेड येथील चोरी प्रकरणाचा तपास एलसीबी व राळेगाव पोलिस करत असून, अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नाही.
मी स्वतः अधिकाèयांसोबत रात्री गावोगावी गस्त घालत आहे. चोरट्यांचा कोणत्याही संशयास्पद हालचाली दिसल्यास किंवा चोरी झाल्यास नागरिकांनी तात्काळ 112 वर फोन करावा. पोलिस पाटलांना सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी रात्री गावामध्ये दक्ष राहावे. अफवांवर विश्वास न ठेवता पोलिसांशी थेट संपर्क साधावा. पोलिस सतर्क असून नागरिकांनीही सजग राहावे. कोणतीही अनोळखी व्यक्ती गावात आल्यास तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्यास त्वरित पोलिसांना कळवावे.
शितल मालटे
राळेगाव ठाणेदार