वर्धा,
female-thief-gang-arrested : व्यावसायिक प्रतिष्ठानाचे शटर वाकवून साहित्य पळविल्या प्रकरणी दाखल गुन्ह्याचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील महिला चोरट्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून १.८२ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या टोळीत एक ऑटोरिक्षा चालक व २ अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे.
शेख एजाज शेख गफार (४०) यांच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. याप्रकरणी गुन्ह्याची नोंद घेतल्यावर शहर पोलिस गुन्हे शोध पथकाची चमू अॅशन मोडवर आली. गोपनीय माहितीच्या आधारे राधानगरी, शांतीनगर परिसरातून लक्ष्मी देऊळकर, भारती इटकर, मनीषा सातपुते, दोन अल्पवयीन मुली सर्व रा. गिट्टी खदान बोरगाव (मेघे) व ऑटोचालक आकाश खत्री रा. इतवारा बाजार याला ताब्यात घेतले. विचारपूस केल्यावर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा ५१ हजार रुपये किंमतीचे साहित्य व गुन्ह्यात वापरलेला ऑटो असा १ लाख ८१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर, पोलिस निरीक्षक पराग पोटे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संतोष ताले, पोलिस उपनिरीक्षक शरद गायकवाड, प्रशांत वंजारी, नरेंद्र कांबळे, वैभव जाधव, श्रावण पवार, शशिकांत मुंडे आदींनी केली.