मुंबई,
Sonu Sood helps एकीकडे सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असताना, दुसरीकडे राज्यातील अनेक शेतकरी आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. अशाच एका हृदयद्रावक घटनेनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. लातूर जिल्ह्यातील एका वृद्ध शेतकऱ्याने, बैल नसल्यामुळे स्वतःला औताला जुंपून शेत नांगरण्यास सुरुवात केली. त्यांच्या या संघर्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
या वृद्ध शेतकऱ्याचं नाव अंबादास पवार असून त्यांच्याकडे ४ बिघा कोरडवाहू जमीन आहे. सिंचनासाठी ते पूर्णतः पावसावर अवलंबून आहेत. त्यांच्या आर्थिक स्थितीचं चित्र इतकं भयावह आहे की, नांगरणीसाठी बैल विकत घेण्याचीही ऐपत त्यांच्याकडे नाही. त्यामुळे शेती करायची तर पर्याय नव्हताच. त्यामुळे अंबादास पवार यांनी स्वतःच औताला जुंपून कष्ट करण्याचा मार्ग निवडला.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला आणि अनेकांच्या भावना चाळवून गेला. गरजूंच्या मदतीसाठी सतत तत्पर असणाऱ्या अभिनेता सोनू सूदनेही या घटनेची दखल घेतली. “तुम्ही नंबर पाठवा, मी बैल पाठवतो,” असं ट्विट करत त्याने अंबादास पवार यांना मदतीचा हात पुढे केला. पुन्हा एकदा सोनू सूदने आपली माणुसकी जपणारी भूमिका सिद्ध केली आहे.
दरम्यान, Sonu Sood helps लातूर तालुक्याचे कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी अंबादास पवार यांच्या शेतावर भेट देऊन त्यांची वस्तुस्थिती जाणून घेतली. त्यांनी सांगितलं की, पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नव्हतं, त्यामुळे ते कृषी यंत्रांसाठी असणाऱ्या अनुदानापासून वंचित होते. सध्या त्यांचं ओळखपत्र तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लवकरच त्यांना ट्रॅक्टरसह इतर कृषी उपकरणं आणि 1.25 लाख रुपयांचं सहाय्य मिळणार आहे, असंही बावगे यांनी स्पष्ट केलं.
ही घटना फक्त एका शेतकऱ्याची नाही, तर हजारो गरजू शेतकऱ्यांच्या वास्तवाचं दर्शन घडवते. प्रशासनाच्या योजना आणि जाहीरनामे जमिनीवर कितपत प्रभावी ठरतात, याचा पुन्हा एकदा विचार करण्याची ही वेळ आहे. अंबादास पवार आणि त्यांच्या पत्नीने दाखवलेला आत्मविश्वास आणि जिद्द हा समाजासाठी प्रेरणादायी आहे.