sankhya-yoga श्रीमद्भगवद्गीतेचा दुसरा अध्याय सांख्ययोग म्हणून परिचित आहे. पहिल्या अध्यायात मोहग्रस्त झालेला अर्जुन दुसऱ्या अध्यायात सहाव्या श्लोकापर्यंत विषादयोगात आहे. त्यानंतर भगवान श्रीकृष्ण सव्यसाची धनंजयाला जे तत्त्व विशद करतात त्याला सांख्ययोग म्हणतात. सांख्य तत्त्वाचे प्रणेते श्री. कपिल महामुनी आहेत. श्रीगीतेच्या दहाव्या अध्यायात स्वयं भगवान म्हणतात ‘‘सिद्धानां कपिलो मुनि:’’ सिद्धांमध्ये मी कपिल महामुनी आहे. हा अधिकार कपिल महामुनींचा आहे. त्यांनी आपले वडील कर्दम ऋषी वनात निघून गेल्यावर, आपली आई देवहुती यांना सांगितलेला उपदेश जो पुढे कपिलगीता नावाने प्रसिद्ध आहे. तोच सांख्ययोग आहे. सांख्य शब्दावरून तो संख्येशी संबंधित असावा हे अनुमान आपल्याला काढता येईल. एक, दोन, तीन अशा असंख्यापर्यंत पोचणाऱ्या गणक अंकांना आपण संख्या म्हणतो. सांख्य म्हणजे गणना करणे, मोजणे, संख्यात्मक गणनेद्वारा तर्क करणे. सांख्ययोगात शास्त्रोक्त, नियमानुसार आणि यथार्थ गणना अपेक्षित आहे.
कपिल महामुनींनी आपली आई देवहुतीला सांगितलेल्या सांख्यमतानुसार त्यांनी एकूण पंचवीस तत्त्वे सांगितली. या तत्त्वांची पद्धतशीर गणना करणे यालाच संख्याक्रम म्हणतात. त्या तत्त्वांना सांख्य म्हणतात. सांख्यमतानुसार जगाची निर्मिती दोन तत्त्वांवर झाली. त्यातील एक आहे प्रकृती आणि दुसरा आहे पुरुष. दोन्ही तत्त्वे आपल्यातच आहेत.sankhya-yoga प्रकृती म्हणजे भौतिक तत्त्व ज्याला सोप्या भाषेत संसार. पुरुष म्हणजे आत्मा म्हणजे परम् तत्त्व. गणना म्हणजे सांख्यतत्त्वात प्रकृतीचे एकूण 24 घटक आहेत. मन, बुद्धी, अहंकार, पंच ज्ञानेंद्रिये, पंच कर्मेंद्रिये, पंच तन्मात्रा (रूप, रस, गंध इत्यादी), पंच महाभूते असे एकूण 23 आणि प्रत्यक्ष प्रकृती असे एकूण 24 घटक आणि दुसऱ्या बाजूला आत्मा असे पंचवीस घटक. या 25 घटकांची सांख्यिकी किंवा क्रमनुसार गणना म्हणून हा सांख्ययोग. सांख्ययोग द्वैत सांगतो म्हणजे प्रकृती वेगळी आणि पुरुष म्हणजे आत्मा वेगळा. आपण स्वत:ला प्रकृतीपासून वेगळे होण्याचा सतत प्रयास करणे म्हणजे संसारात राहून त्याच्या बंधनात न राहणे कारण संसार नश्वर आहे. दुसऱ्या बाजूला आत्मा अमर आहे. आपण त्या आत्मतत्त्वाची अनुभूती घेण्यासाठी सतत प्रयत्नशील असावे. या अर्थाने सांख्य द्वैत सांगतो. असे असले तरी तो पराकोटीचा अद्वैत सांगतो असे माझे मत आहे. म्हणूनच सांख्ययोग सर्वांत श्रेष्ठ योग आहे. मी तर म्हणतो सांख्ययोगातच सर्व योग सामावले आहेत. म्हणून सांख्ययोगाला ज्ञानयोग असेही म्हटले आहे.
ज्ञानं च लोके यदिहास्ति किंचित् सांख्यागतं तच्च महन्महात्मन् !
या जगात जे ज्ञान आहे ते सांख्यमतातूनच आले हे व्यास महर्षी सांगतात.
सांख्ययोग फक्त श्रीगीतेतच आहे असे मानण्याचे कारण नाही. भागवत महापुराणात खुद्द कपिल महामुनींनी आपली आई माता देवहुतीला, भगवान गोपालकृष्णाने उद्धवाला, अष्टावक्र महामुनींनी राजा जनकाला हाच योग सांगितला.
श्रीगीतेत दुसऱ्या अध्यायाला सांख्ययोग म्हटले असले तरी तिसऱ्या अध्यायात तिसरा श्लोक, पाचव्या अध्यायात चौथा आणि पाचवा, तेराव्या अध्यायात श्लोक एकोणवीस ते तेवीस सांख्ययोगाचा उल्लेख ज्ञान संक्रमणासाठी आहे. अनेकांना असे वाटते की सांख्ययोग निरीश्वरवाद सांगतो का? पण हे चूक आहे.
सोप्या भाषेत समजून घेऊ. कर्मयोग, भक्तियोग असे सर्व योग त्या परम तत्त्वापर्यंत पोचण्यासाठीचा मार्ग सांगतात .त्यावर मार्गक्रमण करण्याचा सल्ला देतात. सांख्यमत या सर्वमार्गांचा अर्क आहे. कारण सांख्यमतानुसार मी च परमात्मा आहे. इतर योग ज्याच्यापर्यंत पोचायचे त्यासाठी चालायला सांगतात. सांख्य मतानुसार जिथे जायचे तेच माझ्यात आहे तर मार्गक्रमण कसले?
जर ते परमात्म तत्त्वच माझ्यात आहे तर तुम्ही फक्त त्याची अनुभूती घ्या. तुमच्यातले भाव जागरण करा. ही स्व ची ओळख सांख्यमत सांगते. म्हणून हे मत निरीश्वरवादी नाही.
सांख्यज्ञानालाच भगवंतांनी आत्मज्ञान अर्थात ज्ञानयोग म्हटले आहे. भौतिक जगतात गुंतून केलेली कर्मे ही खऱ्या अर्थाने कर्म नसून कर्म हे चित्तशुद्धीचे साधन असावे. हा कर्मयोग भगवंताला अपेक्षित आहे. आपण ज्याची सतत चिंता करतो ते संसार तत्त्व वास्तव नाही तर आत्मा हा शाश्वत आहे.sankhya-yoga ‘‘ब्रह्म सत्य जगन्मिथ्या’’ या तत्त्वाने प्रकृती आणि पुरुष मांडताना भगवान उदाहरण देऊन स्पष्ट सांगतात की-
वासांसि जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोऽपराणि ।
हे सांख्यमत श्रीगीता मांडते.
विस्तारभयाने केवळ दुसऱ्या अध्यायात सांख्यमत मांडताना भगवंतांनी जे सांगितले ते लक्षात घेतले की सांख्यमताचा परिचय होईल.
1) नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावक: ।
2) अविनाशि तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततम् ।
3) हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम् ।
4) सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जयाजयौ ।
5) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन ।
6) तस्माद्योगाय युज्यस्व योगः कर्मसु कौशलम् ।।
असे परिचित श्लोक अध्याय दोन मध्ये आहेत. त्यानिमित्ताने सर्वांनी श्रीमद्भगवद्गीता वाचून या श्लोकांचा अभ्यास केल्यास हितावह ठरेल.
ग्रंथश्रेष्ठ ज्ञानेश्वरी मध्येदेखील खूप सुंदर विवेचन माउलींनी केले आहे.
1) उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरपि दिसे ।
2) जैसे जिर्ण वस्त्र सांडिजे, मग नूतन वेढीजे ।
थोडक्यात, सांख्ययोगाच्या निमित्ताने भगवंत अर्जुनाला सांगतात की, प्रकृतीमध्ये म्हणजे संसारसागरात गुंतून न राहता त्या परमात्म तत्त्वासाठी या मोहमायेतही स्थित:प्रज्ञ रहा.
प्रजहाति यदा कामान्सर्वान्पार्थ मनोगतान् ।
आत्मन्येवात्मना तुष्ट: स्थितप्रज्ञस्तदोच्यते ।
म्हणजे ज्यावेळी पुरुष मनातील सर्व कामनांचा त्याग करून आत्मानुभूतीने आत्मस्वरूपात संतुष्ट होतो. या अवस्थेला स्थित:प्रज्ञ अवस्था म्हणतात. थोडक्यात उच्च अर्थाने उसात जाऊन पाचोळा अंगाला लागू न देणे अर्थात संसारात असलो तरी संसार अंगाला लागू न देणे आणि त्या आत्मतत्त्वाची अनुभूती घेणे.
सांख्यमत याहून वेगळे नसावे!
प्रा. दिलीप जोशी
9822262735