बुलडाणा,
lalit-gandhi : अल्पसंख्याक समुदायाची लोकसंख्या विचारात घेवून जिल्ह्यात पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे. यासाठी अल्पसंख्याक समुदायाचे वर्गीकरण करणे आवश्यक असून कोणताही समाज विकासापासून वंचित राहू नये यासाठी सर्वानी प्रयत्न करावे. अल्पसंख्याक समुदायाच्या भागातील रस्ते, सभागृहाची राहिलेली अपूर्ण कामे वेळेत पार पाडावी. बुलढाणा जिल्ह्यातील जैन समाजाच्या प्राचिन मंदिरांना तिर्थक्षेत्र दर्जा मिळण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनासोबत बैठक घेऊन जिल्ह्यातील अल्पसंख्याक बहुल ग्रामीण व नागरी क्षेत्रविकास कार्यक्रमासह अल्पसंख्याकांना देण्यात येणार्या विविध योजनांचा आढावा घेतला. शासनाच्या विविध योजनाचा लाभ अल्पसंख्याक समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात दि. ३१ जुलै रोजी आयोजीत बैठकीमध्ये जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम. मोहन, जिल्हा नियोजन अधिकारी राहुल पवार, उपशिक्षणधिकारी उमेश जैन, उद्योजक विजय बा बाफना यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.
महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी म्हणाले की,जिल्हा उद्योग केंद्राकडील अल्पसंख्याक समुदायासाठी ३ टक्के राखीव असलेली कर्ज प्रकरणे तातडीने मार्गी लावावी. तसेच व्यवसाय कोणत्या पध्दतीने केला पाहिजे यासाठी जिल्हा उद्योग केंद्र आणि बँकांनी शिबीरे घेवून गरजवंतांना कर्ज मंजूर करावेत, असे सूचना दिल्या. तसेच जिल्ह्यातील अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी देण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भगवान महावीर निर्वाण कल्याणक निबंध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर निवड झालेल्या स्पर्धेकांना जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष तथा राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य ललित गांधी यांच्या हस्ते प्रमाणपत्र व धनादेश वितरण करण्यात आले. यामध्ये निधी भन्साली, चंदन देशमाने, रिध्दी मेहत्रे, श्रावणी गायकवाड, ऋतुजा चेके, दिव्या औतकर, अरहिंत बोरुंदीया, श्रेयश परसाने, लबांधी खातोड व समृद्ध चिंचोले यांना पारितोषिक देण्यात आले.