तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Prashant Daryapurkar : सध्या वीज वितरण कंपनी वेगवेगळी शक्कल लढवून प्रीपेड व स्मार्ट मीटर लावण्याकरिता कुठल्या थरावर जातील हे सांगता येत नाही आहे. कारण कंपनीने यांनी आताच वीज ग्राहकांना सरासरी बिलाच्या नावाखाली तिप्पट बिल पाठवणे सुरू केले आहे. ज्यामुळे लोक त्रस्त होऊन वीज कंपनीला मीटर टेस्टिंग करायला लावतील व ते मिटर ‘फॉल्टी’ आहे असे दाखवून त्यांच्याकडे नवीन स्मार्ट मीटर लावण्याचे षडयंत्र महावितरण करत असल्याचे वीज ग्राहक संघतनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष संघटनेचे अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर यांनी म्हतले आहे.
ज्या व्यक्तीला मागल्या वर्षीच्या जून महिन्यात 200 युनिटचे बिल आले असेल तर यावर्षी त्याला ‘अॅव्हरेज’ म्हणून थेट 500 ते 600 युनिटचे बिल पाठवीत आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. बरेचसे ग्राहक या कारणामुळे त्रस्त झाले आहेत व वीज कंपनी कार्यालयात खेटे घेत आहेत, अशी माहिती संघटनेने दिली आहे.
तर दुसरीकडे, ज्यांच्याकडे दोन महिन्यांचे बिल थकीत आहे त्यांच्याकडून ‘सिक्युरिटी डिपॉझिट’मधून पैसे वळते करण्यात येत आहेत. जेणेकरून तुमचं ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ शून्य होईल आणि तुमच्याकडे स्मार्ट प्रीपेड मीटर लावणे अगदी सोपे जाईल, असे गणित आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
या वीज वितरण कंपनीच्या अशा नवनवीन उपक्रमांना आता जनता कंटाळली आहे आणि मोठा विद्रोह होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक विद्युत ग्राहकाने आपले ‘सिक्युरिटी डिपॉझिट’ शून्य होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही त्यांनी म्हटले आहे.
वीज ग्राहक संघटनेने प्रीपेड मीटर लावू नये याकरिता उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केलेली आहे. त्याची आता येत्या 14 ऑगस्टला सुनावणी होणार आहे, अशी माहितीसुद्धा संघटनेने दिली आहे.
त्यामुळे अव्वाच्या सव्वा आलेल्या ‘अॅव्हरेज’ बिलाविरुद्ध ताबडतोब तक्रार करावी आणि आपले सिक्युरिटी डिपॉझिट शून्य होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर, उपाध्यक्ष राजू जेकब, सचिव कमल मिश्रा, सदस्य सुहास सावरकर, अविनाश धन्यवाद व सल्लागार दत्ता कुलकर्णी व डॉ. अमोल देशमुख यांनी केले आहे.
मनमानीविरुद्ध पोलिसांत तक्रार
267 युनिट वीज वापर केला असताना मीटर रिडिंग न घेता स्वतःच्या मनाने 375 युनिट वीज वापरल्याचे 4850 रुपयांचे खोटे बिल तयार करून पैशांची मागणी करून फसवणूक करणाèया वीज वितरण कंपनीचे अधीक्षक व कार्यकारी अभियंता यांच्या विरोधात बीएनएस कलम 318 (3), 316 (1), (2), (5) व 340 (2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता मी स्वत: बुधवार, 30 जुलै यवतमाळच्या अवधूतवाडी पोलिस ठाण्यात अधिकृत तक्रार केली आहे, अशी माहिती येथील सामाजिक व माहिती अधिकार कार्यकर्ते दिगंबर पजगाडे यांनी दिली आहे.