पुलगाव,
Hariramnagar येथील हरीरामनगर मधून श्री टॉकीज कडे जाणाऱ्या रस्त्यावर वळणाच्या ठिकाणी असलेली मिलची जीर्ण भिंत वाहतुकीच्या मार्गावर केव्हाही पडण्याची शक्यता होती. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असल्यामुळे भिंत पडल्यास मोठा अनर्थ घडू शकत होता. परंतु या भागातील कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक गौरव दांडेकर यांनी प्रशासनाशी संपर्क करून यावर त्वरित उपाययोजना करण्याची विनंती केली.

नगरपरिषद प्रशासनाने आज दिनांक पाच जुलै २०२५ ला जेसीपी द्वारे भिंतीचा जीर्णभाग काढून टाकला. त्यामुळे या रस्त्याने वाहतूक करणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळालेला आहे. या मार्गाने आदर्श हायस्कूल येथील विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर आवागमन करतात. त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागातील नागरिक याच रस्त्याने जाणे-येणे करतात. त्यामुळे केव्हाही धोका घडून येऊ शकत होता. नगरपरिषद प्रशासनाने तातडीने कारवाई करत भिंत पाडल्यामुळे पुलगाव शहरातील नागरिकांनी नगर परीषद प्रशासन पुलगाव आणि सामाजिक कार्यकर्ते गौरव दांडेकर यांचे आभार मानले आहे. मिल प्रशासनाने सुद्धा या भिंतीचा बाहेर आलेला भाग काढून टाकून लवकरात लवकर व्यवस्थित करण्याचे आश्वासन दिले आहे. मिलचे वरिष्ठ अधिकारी महादेवराव कणसे यांनी लवकरच कामाला सुरुवात करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.