Marathi man माझा मुलगा मराठी माध्यमात शिकतो, मी स्वतः मराठी भाषा आणि मराठी शाळा टिकवण्यासाठी माझ्या परीने प्रयत्न करत आहे, या वाक्याने लेखाची सुरुवात करत आहे. हे सांगण्याचं कारण मराठीचा साधा गंधही नसलेले लोक, आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालणारे लोक, घरात मुलांना आई-बाबा, आजी-आजोबा असं बोलायला न शिकवता मम्मी-पप्पा, मम्मा, मॉड, डॅड्डा-फॅड्डा म्हणायला शिकवणारे लोक मराठीचे कैवारी असल्याचा आव आणतात. त्यांचा समाचार आधीच घेतलेला बरा! आता लेखाला सुरुवात. महानगरपालिकेची निवडणूक आता जवळ आली आहे. बीएमसी ही सोन्याचं अंड देणारी कोंबडी आहे आणि सर्वांचेच डोळे त्याकडे लागले आहेत. अनेक वर्षे पालिकेवर शिवसेनेची सत्ता होती. आता ही सत्ता भाजपाकडे जाण्याची चिन्हे दिसत आहेत. कारण मागच्या वेळी देवेंद्र फडणवीसांनी जुन्या मैत्रीला जागून पालिकेची सत्ता मिळवली नाही. निवडणूक जवळ आल्यामुळे नेहमीप्रमाणे महाराष्ट्राचं वातावरण गढूळ करण्याचं काम राजकीय पक्षांकडून केलं जात आहे. सर्वप्रथम मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की, महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे.

महाराष्ट्रात राहणाऱ्या, किमान 1 वर्ष वास्तव्य करणाऱ्या माणसाला तोडकं मोडकं का होईना, पण मराठी आलीच पाहिजे. ‘‘हम मराठी नहीं बोलेंगे, जो करना है करो’’ हा माज चालणारच नाही. आणि सरकारनेच यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य मिळालेच पाहिजे. त्यासाठी विविध ठिकाणी वाचनालये, मराठी शिकवणी, साहित्य सभा, वाचन कट्टा इत्यादी कार्यक्रम राबवून लोकांमध्ये विशेषतः तरुण व लहान मुलांमध्ये मराठीची गोडी वाढवली पाहिजे. अशी अनेक चांगली कामे करता येऊ शकतात. परंतु उपद्रव माजवणाऱ्यांना केवळ सत्ता हवी आहे. कोणतेही चांगले व सुसंस्कृत काम करायचे नाही.
आता आपण खळ्खट्ट्याकवर चर्चा करूया. राजराव ठाकरे (साहेब हा शब्द फारसी आहे, परकीय आहे, मराठी नाही, भारतीय नाही आणि राज ठाकरे हे मराठीसाठी आग्रही आहेत. म्हणून त्यांच्या सन्मानार्थ साहेब या शब्दाला अलगद उचलून बाजूला काढले आणि राव हा आदरार्थी शब्द वापरला आहे. मराठीच्या कैवाऱ्यांना हे माहीत नसावे म्हणून हे स्पष्टीकरण.) आणि मनसे निवडणूक आली की जोमात असतात. सध्या मनसेचं मराठीविषयीचं आंदोलन सुरू झालेलं आहे. अर्धात त्यांच्यापैकी बहुतेकांची मुलं इंग्रजी माध्यमात शिकत असणार व घरी मम्मी-डॅड्डीचं खुळही सुरू असणार. ते असो, ते चालायचंच! मी वर स्पष्ट केल्यानुसार महाराष्ट्रात मराठीला प्राधान्य दिलेच पाहिजे. महाराष्ट्रात मराठीमध्ये बोललंच पाहिजे, दुकानांवर मराठी पाट्या लागल्याच पाहिजेत. ‘‘च’’ चा आग्रह आहे. मात्र नितेश राणे यांनी एक शंका व्यक्त केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की ही दादागिरी केवळ हिंदूंवरच होते. पण डोंगरी, भेंडीबाजार, कुर्ला, वांद्रे, मालवणी, मानखुर्द-गोवंडी, मुंब्रा येथे ही मंडळी मराठीचा आग्रह का धरत नाही? त्यांना मुसलमानांची भीती वाटते का? हिंदू व्यापारी फार फार तर सनदशीर व लोकशाही मार्गाने प्रतिकार करतील. पण वरील क्षेत्राचे रहिवासी खळखट्ट्याक करणाऱ्यावरच विपरीत-खळखट्ट्याक करतील ही भीती त्यांना वाटते का? असा प्रश्न नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे. यामध्ये तथ्य देखील आहे.Marathi man कारण तिथे जाऊन मराठीचा आग्रह करण्याची धमक या शूरवीरांनी अजून तरी दाखवलेली नाही. दुसरी गोष्ट स्वत: राजराव यांनीही उत्तर भारतीयांविरोधात हाणामारीची भाषा केली असली तरी हुतात्मा चौकावर दंगल करणाèयांविरुद्ध, मराठी माणसाला, पोलिसांना, महिलांना व महिला पोलिसांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध मोर्चा काढला. तेव्हा खळखट्ट्याकची भाषा केली नाही.
त्यामुळे नितेश राणे यांच्या बोलण्यात तथ्य असावे असा प्रश्न मराठी माणसाला पडू लागला आहे. दुसरी गोष्ट राज ठाकरे यांच्यावर टीका केली तरी हे लोक मराठी माणसालाच मारायला कमी करत नाही. तिथे हे लोक भव्य सूट देत नाहीत. म्हणजे मराठी माणसाने टीका केली (कोणावरही खालच्या दर्जाची, वैयक्तिक, त्यांच्या कुटुंबाला शिव्या देणारी टीका करूच नये, या मतांचा मी आहे. इथेही ‘‘च’’ चा आग्रह आहे मंडळींनो. पण तुम्ही स्वा. सावरकर, फडणवीस, मोदी अशांवर कितीही खालच्या दर्जाची टीका करू शकता, असा समज या लोकांनी करून घेतलेला आहे. असो, चालायचेच!) तर फक्त समजूत काढायची किंवा त्यांच्या घराबाहेर मोर्चा काढायचा, असं ते करत नाहीत. ते मराठीचं नाव घेतात आणि मराठी माणसालाच मारतात. मग यांना नेमके काय सिद्ध करायचे आहे? याविषयी आपण पुढे बोलू आता चर्चा करूया राजराव-उद्धवराव मनोमिलनावर.
राजराव आणि उद्धवराव एकत्र येण्याची चर्चा सगळीकडे सुरू झाली आहे. बॅनरही लागले आहेत. ‘‘मोर्चात कोणताही झेंडा नसेल. फक्त मराठीचा अझेंडा असेल.’’ आता ‘‘अझेंडा’’ काय असतं हे मराठीच्या कैवारींनी सांगावं. असो, तसंही अजेंडा हा इंग्रजी शब्द असल्याने त्यांनी इंग्रजीचा अपमान केला आहे, मराठीचा नव्हे असा समज करून आपण याकडे दुर्लक्ष करूया. तर दोन भाऊ एकत्र येत आहेत. ही खरोखर आनंदाची बातमी आहे. मी तर म्हणतो जगाच्या सर्वच भावंडांमधील, भावकीमधील भांडणं मिटून सगळे एकत्र आले पाहिजेत. त्या दोघांनाही या कट्टर मराठी माणसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा. मात्र हे दोघं मराठीसाठी एकत्र येत आहेत, असा भ्रामक प्रचार होताना दिसतो. दोघं वेगळे झाले ते सत्तासंघर्षामुळे आणि आता एकत्र येण्याच्या योजना आखल्या जात आहेत ते सत्ता हस्तगत करण्यासाठी. अर्थात त्यांनी एकत्र यावं, प्रचार करावा, निवडणूक लढवावी याबाबत कोणाला काहीच देणं घेणं नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तर म्हणतात, ‘‘त्यांनी जरूर एकत्र यावे. क्रिकेट - टेनिस खेळावे; जेवण करावे आमची काहीच हरकत नाही. ते दोघे एकत्र येणार असतील तर आनंदच आहे.’’ तसा आम्हालाही आनंदच आहे. पण ते मराठीसाठी एकत्र येत आहेत असं नका ना बोलू. दोघांची मुले इंग्रजी माध्यमात शिकलेली आहेत. त्यामुळे त्यांना मराठीशी तसं काही देणं घेणं आहे असं वाटत नाही. उलट परप्रांतीयांचे लोंढे वाढले ते शिवसेनेचे वर्चस्व असतानाच. हिंदी सामना सुरू झाला तो परप्रांतीयांना खुश करण्यासाठी. या दोन्ही नेत्यांकडे कोणतीही दूरदृष्टी नाही. आहे ते केवळ उपद्रवमूल्य. उद्धवराव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना तर मुख्यमंत्री कसा नसावा, सत्ता कशी राबवू नये याचा एक सुंदर आदर्श घालून दिला आहे. हे पाहा मराठी वाचकहो, मराठी माणसाला प्रगतिपथावर घेऊन जाणारा, दूरदृष्टी असलेला नेता हवा आहे.Marathi man ट्रेनमध्ये वैयक्तिक भांडण झालं तरी समोरची व्यक्ती परप्रांतीय आहे म्हणून ‘‘भैय्या, गांडा भाई’’ म्हणून हिणवत मराठी माणूस आपलं नैराश्य बाहेर काढत असतो. पण आपण मराठी म्हणून विचार करायला हवा की छत्रपती शिवाजी महाराजांनी भारताला विश्वास दिला की या परकीय जिहादी आक्रमकांना आपण पळवून लावू शकतो. शिवराय अखंड हिंदुस्थानाचे छत्रपती झाले. पुढे मराठी माणसाने भारतावर राज्य केलं. टिळक, सावरकर प्रभृती नेत्यांनी भारताचं नेतृत्व केलं. पण नंतर मराठी माणसाची पकड हळूहळू कमी होऊ लागली. ती का झाली, याचं विश्लेषण आपण मराठी माणसाने केलं पाहिजे. त्यास काही घटक कारणीभूत आहेत. एकतर आपल्याकडे पुरोगामी हा शब्द वापरत प्रचंड जातीयवाद पसरवला गेला, इंग्रजीचं इतकं आक्रमण झालं की आताच्या मराठी मुलांना धड मराठी वाचताही येत नाही, तिसरं कारण मराठीच्या नावाने राजकारण करणाèया नेत्यांनी आपल्या हातात धोंडा दिला. आपण त्वेषाने धोंडा फेकून मारत राहिलो, आपली परिस्थितीही धोंड्यासारखी झाली. पण ज्यांनी आपल्या हातात धोंडा दिला ते गर्भश्रीमंत झाले. हे कसे? हे कोडे ज्या दिवशी मराठी माणूस सोडवू शकेल त्या दिवशी मराठी माणूस जगावर राज्य करेल. तूर्तास धोंडा देणाèयांना एवढंच सांगावसं वाटतं की ‘‘तुमचा खेळ होतो, पण मराठी माणसाचा जीव जातो!’’
लेखक : जयेश शत्रुघ्न मेस्त्री