वर्धा,
Wardha News शेतात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला असला तरी काही कामांना मजुरांचीच गरज पडते. परंतु, सद्यःस्थितीत शेतात मजूर मिळणे दुरापस्त झाले आहे. अधिक मजुरी देऊन मजुरांची मनधरणी करावी लागत आहे. पूर्वी मजूर शेतकर्याच्या घरी यायचे, आता शेतकर्यांना मजुराच्या घरी जावे लागत आहे. परिणामी, शेतकरी वैतागला आहे. वेळप्रसंगी त्याला कुटुंबातील सदस्यांना सोबत घेऊन शेतीची कामे करून घ्यावी लागत आहे. ही वास्तविकता प्रत्येक गावातील आहे.

देशातील ७० टके नागरिकांचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून आहे. तर शेतीवर आधारित अनेक उद्योगधंदे आहेत. जवळपास दोन दशकांपूर्वी गावखेड्यात शेतीसाठी सहज मजूर मिळत होते. यामुळे शेतीची कामे वेळेत होत होती. कालांतराने परिस्थिती बदलत गेली. गावातील युवापिढी शेती व्यवसाय करण्यास तयार नाही. तर शहरात जाऊन मिळेल ती नोकरी करतात. परिणामी, गावे ओस पडत आहेत. शेतात यांत्रिकीकरणाने शिरकाव केला आहे. जवळपास ६० ते ७० टके शेतीची कामे यंत्रानेच होत आहे. काही ठरावीक कामांना आजही मजुरांची गरज पडते. ते मजूरसुद्धा शेतकर्यांना वेळेवर मिळत नाही. वेळप्रसंगी अधिक मजुरी देऊन शेतकर्यांना मजुरांची मनधरणी करावी लागते. काही शेतकरी बाहेरगावाहून मजूर आणतात. त्यांचा प्रवास खर्च शेतकर्यांनाच द्यावा लागतो. पूर्वी किमान आठ तास मजूर शेतात काम करायचे. तर आता मजूर तासाप्रमाणे मजुरी मागतात. या प्रकारामुळे शेतकरी त्रस्त झाले आहे.
फुकट्या योजनांचा परिणाम
सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत. यात निराधार, पी. एम किसान योजना, लाडकी बहीण, मोफत धान्य या योजनांतून नागरिकांना महिन्याकाठी ठरावीक रकम मिळते. तर बेघरांना शासन घरसुद्धा बांधून देत आहेत. तर जिपच्या शाळेत मुलांचे शिक्षणसुद्धा मोफत होते. परिणामी, अनेक मजूर नियमित कामाला जात नसून आठवड्यातून एक ते दोन दिवसच कामाला जातात. यामुळे गावखेड्यात शेतीच्या कामाला मजूर मिळत नसल्याचे शेतकरी बोलत आहेत.