शैलेश भोयर
नागपूर,
Ramdas Peth Nagpur beggars मुलांवर प्रेम करणारी आई मागतेय् भिक्षा. मुले, मुली, नातवंडे असा आप्तपरिवार असतानाही तिच्यावर ही वेळ का आली असेल? काहींना परिश्रम न करता सर्व काही मिळविण्याची सवय असते. परंतु, यातील काही महिला प्रतिकूल परिस्थितीमुळे भिक्षा मागतात. परंतु त्यांना सतत भीती असते, भिक्षा मागताना माझी मुलगी, जावई दिसेल तर, परिसरातील प्रतिष्ठित लोक दिसले तर, परंतु, रक्ताचे नाते असलेल्या मुलांना आई भिक्षा मागते याचे काहीच कसे वाटत नाही? हे धडधडीत सत्य घेऊन त्या महिला दररोज रामदासपेठ परिसरात भिक्षा मागतात.

कधी काळी त्याही तरुण होत्या. इतर मुलींप्रमाणे त्यासुद्धा नटूनथटून राहायच्या. आर्थिक स्थिती जेमतेम असली तरी त्या स्वाभिमानी होत्या. इतर मुलींप्रमाणे त्यांचेही लग्न झाले. त्यासुद्धा सासरी गेल्या. तारुण्यातील दिवस आनंदात गेले. मुले झाल्यानंतर जबाबदारीचा व्याप वाढत गेला आणि इकडे वयाला उतरती कळा आली. मुले मोठी झाली. मुलांची लग्ने झाली. मुली आपापल्या घरी गेल्या, तर सुना आल्यानंतर मुलांनी वेगळी चूल मांडली. आता घरात केवळ वृद्ध आई आणि वडील. शासकीय नोकरी नसल्याने निवृत्तिवेतन मिळण्याचा प्रश्नच नाही. शरीरात शक्ती असेपर्यंत त्या वृद्ध वडिलांनी काम केले. आता कामधंदा करणे शक्य नाही. पोटाची खळगी भरायची कशी? त्यामुळे त्या महिला घराबाहेर पडल्या, चक्क भिक्षा मागायला. भररस्त्यात कोणासमोर हात पसरणे किती अवघड काम आहे. तारुण्यात असताना त्यांनी कधी विचारही केला नसेल. परंतु, मुलांनी साथ सोडल्याने त्यांच्यावर हात पसरण्याची वेळ आली. आता त्यांनी ही मानसिकताही स्वीकारली आहे. इतर महिलांप्रमाणे त्यांच्याही इच्छा आणि अपेक्षा होत्या. आयुष्यात सर्वच गोष्टी मनासारख्या घडत नाहीत. सर्वच इच्छा पूर्ण होत नाहीत, हे त्यांना कळून चुकले आहे.
रामदासपेठ परिसरात सकाळी 11 ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत त्या महिला भिक्षा मागतात. घरी गेल्यावर मिळालेल्या पैशांतून चूल पेटवितात. त्याच पैशांत आजारी पतीवर औषधोपचार करतात. अनेकांना या महिला हात पसरताना दिसल्या असतील. काहींनी उदार मनाने, काहींनी सामाजिक जाणिवेतून, तर काही संवेदनशील मनातून भिक्षा दिली असेल. हे यांचे दररोजचेच आहे, यांना काहीच देऊ नका, असेही म्हणारे आहेत. भिक्षा मागणे गुन्हा आहे. मात्र, उपजीविका चालविण्यास त्या असमर्थ आहेत. आर्थिक, मानसिक आणि भावनिक स्तरावर दिव्यांग आहेत. दु:खाशी दोनहात करण्यासाठी त्यांच्यात कुठलीच शक्ती नसल्याने कदाचित त्यांच्यापैकी काही महिला भिक्षा मागण्यासाठी हात पसरत असाव्यात.